हिंमत आणि ताकद असामाजिक तत्त्वांकडेही असतात परंतु पोलिसांकडे साहस आणि कायद्यांचा चाबूक असतो, सोबतच पोलिसांकडे चारित्रही असते. त्यांच्या या चारित्र्यसंपन्नतेमुळे जनता पोलिसांवर विश्वास ठेवतात आणि त्यांना आपले रक्षक समजतात. परंतु जनतेच्या या विश्वासाला पोलिसांनीच जर तडा दिला तर जनता त्यांच्यावर विश्वास कसा ठेवतील? रक्षकच भक्षक बनले तर जनता त्यांच्यावर विश्वास ठेवतील काय ? जळगाव पोलिसांनी जे निंदनीय कृत्य केले आहे, त्यामुळे राज्यातील जनतेचा पोलिसांवरील विश्वासाला तडा गेलेला आहे.
जळगाव येथील मुलींचे शासकीय वसतिगृह आशादीप महिला आश्रमात नुकत्याच घडलेल्या घटनेमुळे राज्यसरकार आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गेल्या २८ फेब्रुवारी रोजी रात्री काही पोलिस शिपाई ब बाहेरची मंडळी या महिला आश्रमात घुसले आणि त्यांनी या वसतिगृहातील मुलींना कपडे काढून नाचण्यासाठी मजबूर केले.
पोलिसच जर असे दुष्कृत्य करतील तर अन्यायाची दाद मागण्यासाठी या युवतींनी कोणाकडे जावे ? हे पोलिस होते की दुर्योधनाचे वंशज ? दुर्योधन आणि दुशासनाने जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण केले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरविले होते, परंतु या मुलींना मात्र वस्त्र पुरविण्यासाठी कोणीही नव्हते. या लेडीज होस्टेलमध्ये पोलिसांनी जो नंगानाच केला तो ‘जाणता राजा’ शिवछत्रपतीच्या नावाने व महाराष्ट्राचे सरकार चालविणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला मोठे आव्हानच आहे. या प्रकरणाची तीत्र प्रतिक्रिया विधानसभेत उमटली. भाजपाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले. सरकारने आता या घटनेत सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटनेची पुनरावृती होणार नाही.






