फेब्रुवारी महिन्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललीय. गेल्या काही आठवड्यांपासून तर रोज सापडणाऱ्या कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत चाललंय. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्यानं आपापल्या हद्दीत प्रवेशाबाबतचं धोरण ठरवलं असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. ज्या राज्यांत कोरोनाचं प्रमाण अधिक आहे, त्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलंय.
आता कोरोना चाचणी करणं हे रेल्वे प्रवाशांसाठी बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्रानं सहा राज्यांतील नागरिकांसाठी कोरोना टेस्ट करणं बंधनकारक केलंय. महाराष्ट्रात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी RT – PCR टेस्ट केलेली असणं बंधनकारक असणार आहे. गोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यातून जर तुम्ही रेल्वेने महाराष्ट्रात येणार असाल, तर गेल्या ४८ तासांत RT – PCR टेस्ट केलेली असणं आणि त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे.
RT – PCR टेस्ट केल्याशिवाय कुणालाही महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नाही. टेस्टचा रिपोर्ट न घेता कुणी महाराष्ट्रात दाखल झाले, तर त्याला तातडीने विलगीकरणात नेऊन त्याची टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टचा रिपोर्ट आल्याशिवाय त्याला महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं घेतलाय. [read_also content=”कोरोनाच्या पहिल्या लाटेत ३ कोटी मध्यमवर्गीय झाले होते गरीब, दुसरी लाट अधिक घातक, कसं असेल भविष्यातलं चित्र? https://www.navarashtra.com/latest-news/more-than-3-crore-middle-class-became-poor-in-coronas-first-wave-nraj-117089.html”]
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र आता इतर राज्यांतही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर इतर राज्यांतील नागरिकांमार्फत महाराष्ट्रात कोरोना पसरू नये, यासाठी हा निर्णय़ घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. रस्तेमार्गे आणि स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या नागरिकांसाठीचे नियम अगोदरच राज्य सरकारने जाहीर केले आहेत. आता रेल्वेमार्गे येणाऱ्या सहा राज्यांतील प्रवाशांना कोरोना टेस्ट करणं बंधनकारक करण्यात आलंय.






