उन्हाळ्यात किडनी स्टोनची समस्या का वाढतेय (फोटो सौजन्य - iStock)
उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे अधिक प्रमाणात द्रव बाहेर जातो. ही कमतरता पुरेशा पाण्याने भरून न काढल्यास शरीर डिहायड्रेट होते आणि लघवीचा रंग दाटसर पिवळा दिसतो. यामुळे खनिजं आणि क्षारांचे स्फटिक स्वरुपात रुपांतर होते.यामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. कमी पाणी पिणे आणि प्रायव्हेट भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील वाढतो, विशेषतः महिलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये या संसर्गाचे प्रमाण अधिक असते.
काय आहे मुख्य कारण
उन्हाळ्यात किडनी स्टोनच्या रुग्णांची संख्या वाढली असून यामागचे प्रमुख कारण म्हणजे जास्त घामामुळे होणारे डिहायड्रेशन ज्यामुळे मूतखडा तयार होतो. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास लघवीतील खनिजे आणि क्षार स्फटिकरूप धारण करतात आणि त्यामुळे मूतखडा तयार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर, कमी पाणी पिण्यामुळे लघवीचे प्रमाण घटते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढण्यास अनुकूल वातावरण तयार होते आणि मूत्रमार्गातील संसर्ग वाढतो.
सध्या किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला २५-५५ वयोगटातील १० रुग्णांपैकी सुमारे २ जणांना मूतखडा तर २-३ रुग्णांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग आढळतो, अशी माहिती डॉ. पवन रहांदळे, युरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा, पुणे यांनी दिली.
काय आहेत लक्षणे
डॉ. पवन पुढे म्हणाले, रुग्णांमध्ये सामान्यतः कमरेच्या खालच्या भागात किंवा बाजूला तीव्र वेदना होतात , लघवी करताना जळजळ होते, वारंवार लघवी लागणे, ताप आणि अस्वस्थता अशी लक्षणे दिसतात. वेळीच उपचार न केल्यास किडनी स्टोनमुळे लघवीच्या मार्गात अडथळा येऊ शकतो किंवा संसर्ग होऊ शकतो, तर दुर्लक्ष केल्यास युटीआय संसर्ग किडनीपर्यंत पसरून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
आजाराच्या तीव्रतेनुसार यावर उपचार ठरवले जातात; लहान स्टोन औषधोपचार आणि जास्त पाणी पिण्याने नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात, तर मोठ्या स्टोनसाठी लेझर उपचार किंवा मिनिमली इन्वेसिव्ह शस्त्रक्रिया करावी लागू शकते. युटीआय संसर्ग हा साधारणतः अँटिबायोटिक्स, पुरेसे पाणी पिणे आणि ठराविक औषधाोपचारांनी बरा होतो.
काय आहे रुग्णांचा रेशो
डॉ. प्रसाद कुलट, वरीष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी सांगितले की, तापमानात झालेल्या तीव्र वाढीमुळे उन्हाळ्यात किडनी स्टोन आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात अशा रुग्णांमध्ये सुमारे २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला २५ ते ५५ वयोगटातील १० पैकी १ रुग्ण किडनी स्टोनच्या समस्येने ओपीडीत दाखल होतो. तर जवळपास २ रुग्ण हे मूत्रमार्गाच्या संसर्गाने ओपीडीत दाखल होतात.
यामागील मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन, जे जास्त घाम येणे आणि पुरेसे पाणी न पिणे यामुळे उद्भवते, ज्यामुळे स्टोन तयार होण्यास आणि बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. अशा रुग्णांमध्ये कमरेच्या बाजूच्या भागात तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ, वारंवार लघवी होणे आणि काहीवेळा ताप येणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार केल्यास लवकर बरे होता येते.






