चिपळूण : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचं संकट मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच या कोरोना महामारीला कंटाळून एका ४५ वर्षीय कोरोना रूग्णाने रूग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिपळूणमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ४५ वर्षीय व्यक्तीचं कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ६ ऑगस्टला या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच कामथे रुग्णालयात त्याच्यावर कोविड-१९ चे उपचार सुरू होते. परंतु मध्य रात्रीच्या सुमारास या व्यक्तीनं रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन गळफास घेतला. त्यामुळे येथील रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कोरोना संकटाच्या भीतीपोटी या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच पुढील चौकशी पोलीस करत आहेत.