सीतापूरमध्ये अटकेनंतर प्रियंका गांधींनी पीएसी गेस्ट हाऊसमधून फोनद्वारे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंगळवारी त्यांच्या समर्थनार्थ मशाल मिरवणूकही काढण्यात आली. लखीमपूरमधील शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आरोपींना अटक करण्याची आणि मंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. प्रियंका गांधी यांनी गेस्ट हाऊसच्या बाहेर जमलेल्या समर्थकांना फोनद्वारे संबोधित केले आणि यूपी सरकारवर जोरदार टीका केली.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचे पडसाद मंगळवारीही उमटले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला लक्ष्य करत विरोधकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या पुत्राला अटक करण्याची मागणी जोरकसपणे मांडली. दुसरीकडे, सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँगे्रस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ही कारवाई बेकायदा असून, ३८ तासांनंतरही आपल्याला संबंधित कागदपत्रे, नोटीस देण्यात आलेली नाही, असे प्रियंका यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले.
प्रियंका गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जामीन अर्ज भरण्यास नकार दिला आहे. अटकेनंतर काँग्रेस सरचिटणीसांनी एक निवेदन जारी करत प्रशासनाने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आणि त्यांला तुरुंगात ठेवल्याचा आरोप केला. प्रियांकाच्या म्हणण्यानुसार, “जेव्हा मला ताब्यात घेण्यात आले तेव्हा मी सीतापूर जिल्ह्यात होतो, माझ्या माहितीनुसार, सीतापूर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले नव्हते. 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मला कळवले नव्हते की कोणत्या कारणास्तव मला ताब्यात घेण्यात आलंय किंवा मला कोणत्या कलमाखाली ताब्यात घेण्यात आले आहे.”
“मला ना नोटीस दाखवल्या गेल्या आहेत, ना माझ्या कोठडीबाबत कोणताही आदेश. मला एकही एफआयआर देण्यात आलेला नाही. माझे वकील सकाळपासून गेटवर उभे आहेत. मला कायदेशीर सल्ल्यासाठी माझ्या वकिलांना भेटण्याचा अधिकारही नाकारण्यात आला.” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.