पावसाळ्यात का वाढतेय घोट्याच्या दुखापतींचे प्रमाण (फोटो सौजन्य - iStock)
यंदाच्या पावसाळ्यात पाय आणि घोट्यासंबंधित वेदनेच्या घटनांमध्ये तीस टक्के वाढ झाल्याची नोंद डॉक्टरांनी केली आहे. घोट्याला दुखापत होण्यास कारणीभूत घटकांपैकी निसरडा पृष्ठभाग, खड्डे, खराब रस्ते आणि चुकीच्या पादत्राणांचा वापर तसेच दुचाकी अपघातांचा समावेश आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्याम ठक्कर म्हणाले की, मुसळधार पाऊस आणि ओलसर पृष्ठभागामुळे पावसाळ्यात बाहेर फिरणाऱ्यांसाठी त्रासदायक ठरु शकतो. निसरडे रस्ते, ओल्या फरशा, असमान पृष्ठभाग आणि चिखलाचे रस्ते यामुळे पाय घसरण्यासारख्या घटना घडतात, ज्यामुळे अनेकदा पाय आणि घोट्याला दुखापत होते.
पाय अचानक आतल्या किंवा बाहेरच्या बाजूस वळल्यावर घोटा मुरगळतो, ज्यामुळे त्याला आधार देणाऱ्या अस्थिबंधनांवरही ताण येतो. योग्य उपचार न केल्यास, ही वेदनादायक दुखापत गतिशीलता आणि हालचालींवर परिणाम करू शकते. यामुळे रुग्णाला चालण्यासारख्या क्रिया करणे देखील कठीण होईल आणि त्यांना दररोज त्रास होऊ शकतो. म्हणून, वेळीच तज्ज्ञांची मदत घ्या आणि जीवनाची गुणवत्ता सुधारा (फोटो सौजन्य – iStock)
दर महिन्यात होतेय वाढ
निसरडे, खड्डेमय रस्ते आणि अयोग्य पादत्राणांमुळे घोटा मुरगळण्याचे आणि पायाला दुखापत होण्याचे किमान ३ ते ४ प्रकरणं दर महिन्याला आढळून येतात. २५ ते ६५ वयोगटातील लोकांमध्ये पाय आणि घोट्याच्या दुखापतींमध्ये सुमारे ३०% वाढ झाली आहे. सुरुवातीला या दुखापती किरकोळ वाटू शकतात, परंतु तज्ञांकडून त्वरित उपचार न केल्यास त्यामुळे दीर्घकालीन वेदना होऊ शकतात. पादचाऱ्यांना, विशेषतः वृद्धांना आणि ऑफिसला जाणाऱ्यांना, पावसाळ्यात किंवा लगेच नंतर बाहेर पडताना जास्त धोका असतो.
पुरुषांमध्ये वाढतेय मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण, तज्ज्ञांनी सांगितले वेळीच व्हा सावध
गंभीर दुखापतींचे स्वरूप
डॉ. श्याम पुढे म्हणाले, साध्या दुखापतीपासून ते गंभीर फ्रॅक्चरपर्यंत दुखापतींचे स्वरूप व्यक्तीनुसार बदलते. आम्ही अशी काही प्रकरणं पाहिली आहेत जिथे तरुणांनाही ओल्या पायऱ्या किंवा निसरड्या रस्त्यावरून घसरल्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
बहुतेक प्रकरणांमध्ये योग्य विश्रांती आणि उपचाराने रुग्ण बरा होतो , परंतु काही प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात योग्य उपचार न केल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. वारंवार घोट्याच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्यांनी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. हल्ली अशा प्रकरणांमध्ये की होल सर्जरी केली जाते ज्यामध्ये रक्तस्त्राव कमी होतो आणि वेदना देखील कमी होतात. ओपन सर्जरीपेक्षा हे पर्याय चांगले आहेत. उपचार न केल्यास, हे लहान वयातच संधिवातास कारणीभूत ठरते.
कशी घ्याल काळजी
तुमचे रोजच्या वापरातील पादत्राणे अर्थात शूज वापरण्यापूर्वी नीट तपासा आणि ते योग्य स्थितीत असल्याची खात्री करा, उंच टाचांची चप्पल किंवा पायाला पुरेसा आधार न देणारे शूज वापरणे टाळा. त्याऐवजी, घोट्याला आधार देणारे घसरण्यापासून रोखणारे, योग्य मापाचे शूज निवडा.
पाणी साचलेल्या रस्त्यांवर काळजीपूर्वकरितीने चाला. तज्ज्ञांच्या प्रशिक्षणाखाली सौम्य व्यायाम केल्यास पाय व घोट्याची दुखापत बरी होण्यास मदत होऊ शकते. वयस्कर व्यक्तींनी निसरड्या पृष्ठभागावरुन चालताना वॉकिंग स्टिक किंवा हँडरेल वापरण्याचा विचार करावा असेही डॉ. श्याम यांनी स्पष्ट केले.