(फोटो सौजन्य: Pinterest)
आपल्या देशात धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाविक फार श्रद्धेने मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेऊन आपले मन प्रसन्न करतात. देशात अनेक मंदिरं आहेत ज्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी खासियत असते अशातच आज आम्ही तुम्हाला राजस्थानच्या एका अनोख्या मंदिराची माहिती देत आहोत जिथे जे सध्या तरुणांमध्ये खूप चर्चेचा विषय ठरत आहे. हे मंदिर फार भव्य किंवा ऐतिहासिक नाही मात्र याची श्रद्धा याला खास बनवते. भाविक कोणतीही सामान्य इच्छा घेऊन इथे येत नाही तर सरकारी नोकरी मिळण्याच्या आशेने या मंदिराला भेट दिली जाते. मंदिराविषयी अशी धारणा आहे की, जो कोणी या मंदिरात मनापासून प्रार्थना करतो त्याला नक्कीच जीवनात यश प्राप्त होते. यामुळेच आता हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ बनले नाही तर सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो लोकांसाठी आशा आणि श्रद्धेचे प्रतीक बनले आहे. चला मंदिराविषयी काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतात सरकारी नोकऱ्यांना खूप उच्च दर्जा दिला जातो. लोकांचा असा विश्वास आहे की पद लहान असो वा मोठे, जर नोकरी सरकारी असेल तर आदर आपोआप मिळतो. तथापि, आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवणे काही सोपे राहिले नाही. दरवर्षी लाखो उमेदवार यूपीएससी , एसएससी , बँक, रेल्वे, अध्यापन अशा प्रत्येक क्षेत्रात भाग घेतात, परंतु कमी जागा आणि जास्त स्पर्धेमुळे मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. जेव्हा काही उमेदवारांना दिवसरात्र मेहनत करूनही यश मिळत नाही, तेव्हा श्रद्धेशी संबंधित एक विशेष मंदिर त्यांच्यासाठी आशेचे एक किरण बनते.
कुठे आहे हे मंदिर?
राजस्थानच्या अँटेला या लहान गावात हे अनोखे मंदिर वसले आहे. हे मंदिर ‘अंटेला कुंड धाम’ म्हणून ओळखले जाते. प्रत्येक मंदिराची आपली अशी वेगळी ओळख आणि श्रद्धा असते तशीच श्रद्धा या मंदिराविषयी देखील आहे. जो व्यक्ती खऱ्या भावनेने सरकारी नोकरी मिळवण्याच्या हेतूने इथे येतो त्याला आपल्या आयुष्यात नक्कीच यश मिळते. इथे आलेल्या बऱ्याच लोकांना आपल्या आयुष्यात सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत.
गावकऱ्यांची यशोगाथा
या मंदिराची आणखीन एक खासियत म्हणजे हे मंदिर ज्या गावात आहे त्या गावात प्रत्येक दुसऱ्या घरात कोणा ना कोणाला सरकारी नोकरी मिळालेली आहे. कोणी शिक्षक आहे, कोणी कारकून तर कोणी मोठा अधिकारी… गावकऱ्यांचा या मंदिरावर फार विश्वास आहे आणि गावकरी या मंदिराला त्यांच्या ओळखीचे आणि अभिमानाचे केंद्र मानतात. हे मंदिर फक्त गावकऱ्यांच्या श्रद्धेचे ठिकाण नाही तर रोजगाराची आशा देखील बनले आहे.
स्वस्तात पूर्ण होईल नेपाळची सफर; फक्त ‘या’ Travel Tips लक्षात ठेवा
श्रद्धा की अंधश्रद्धा?
काही लोकांसाठी हे मंदिर एक चमत्कार आहे, तर काहींसाठी ते फक्त एक कथा आहे. ज्यांना नोकरी मिळाली त्यांच्यासाठी हे मंदिर देवाचे रूप आहे आणि ज्यांना अपयश आले त्यांच्यासाठी ते एक फसवणूक ठरले. मंदिराविषयीची ही मान्यता खरी आहे की नाही हे तर कुणाला ठाऊक नाही मात्र कठोर परिश्रमाशिवाय आयत यश कधीही हाती लागत नाही हेच सत्य आहे.