वाढत्या वयानुसार प्रत्येकालाच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. तर पुरूषांच्या शरिरातही वयानुसार अनेक बदल होतात. वयाच्या 40 नंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात, ज्यामुळे अनेकदा वजन वाढते आणि पोट आणि कंबरेभोवती चरबी वाढू लागते. यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो, ज्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास जीवघेणंही ठरू शकतं. या वयात पुरुषांना खालील काही लक्षणं दिसू लागली तर समजून घ्या की शरीरात सर्व काही आलबेल नाही. आणि तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. याबाबत झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार,
ऑफिसमधील कामाचा ताण आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे पुरुषांवर अनेकदा जास्त ताण-तणाव येतो. यामुळे हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो. लठ्ठपणामुळे नंतर अनेक शारीरिक त्रास मागे लागू शकतात.
वयाच्या 40 वर्षांनंतर पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हार्मोनचा स्राव कमी होऊ लागतो, ज्यामुळे चरबीचे प्रमाण वाढते. पोटाची चरबी वाढण्याचे कारण चुकीचा आहाक आणि व्यग्र जीवनशैली देखील असू शकते.
वाढत्या वयानुसार, पुरुषांच्या जबाबदाऱ्याही वाढतात, ज्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात अपयशी ठरतात. विशेषत: त्यांना जिममध्ये व्यायाम किंवा इतर वर्कआउटसाठी वेळ मिळत नाही. मात्र, काहीही झालं तरी हे लक्षात ठेवा की, तुमची शारीरिक हालचाल कमी असेल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होणार हे नक्की आहे.
वयाची 40 ओलांडल्यानंतर मेटाबॉलिझमची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे कॅलरी बर्न करण्याची क्षमताही कमी होऊ लागते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो आणि पोटावर चरबी जमा होऊ लागते. पोटावर चरबी जमा होणं हे अनेक गंभीर आजारांचे मूळ आहे.