पावसाळ्यात दम्याच्या रूग्णांनी काय लक्षात ठेवावे
सांधेदुखी आणि त्वचेच्या समस्यांप्रमाणेच पावसाळ्यात श्वसनाच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. पावसाळा सुरु झाल्यावर ढगाळ वातावरण आणि दमट हवामानामुळे हवा अशुद्ध असल्याने दम्यांचे विकार दिसून येतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्हायरल आणि बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे देखील दम्याच्या रुग्णांना दम्याचा अधिक त्रास जाणवू शकतो.
हवामानातील अचानक झालेल्या बदलांमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. दम लागणे, खोकला आणि छातीत घरघर यांसारखी लक्षणे जाणवतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढते प्रमाण, परागकण, डस्ट माइट्स, बुरशी आणि घरातील ऍलर्जीन यासारखे अनेक घटक दम्यास कारणीभूत ठरु शकतात. खालील टिप्सचे पालन करुन दम्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. डॉ. तन्वी भट्ट, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी अधिक योग्य माहिती दिली आहे.
काय पर्याय निवडावा
नियमित मास्कचा वापर करावा
दम्याचा त्रास टाळण्यासाठी जोरदार पाऊ सुरु असताना विनाकारण बाहेल न पडता घरातच राहावे. खिडक्या आणि दार बंद ठेवा आणि घरात बुरशी, धूळ आणि पाळीव प्राण्यांचा कोंडा टाळा. दम्याचा त्रास टाळण्यासाठी मास्क आणि स्कार्फचा पर्याय निवडा. ओलावा टाळण्यासाठी खोल्या, स्वयंपाकघर आणि स्नानगृह कोरडे ठेवा.
स्वच्छता महत्त्वाची
खोलीत हवा खेळती राहील आणि घरात पुरेसा सूर्यप्रकाश येईल हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. घरातील AC वेळोवेळी स्वच्छ करा. घरात ह्युमिडिफायर वापरा जेणेकरुन तुम्हाला मोकळा श्वास घेण्यास मदत होईल. दम्याचे रूग्ण घरात असतील तर या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
हेदेखील वाचा – दम्याचे व्यवस्थापन कसे कराल? वाढतेय मृत्यूचे प्रमाण वेळीच व्हा सावध!
बाथरूमची स्वच्छता
बाथरूममध्ये स्वच्छता असणे अत्यंत गरजेचे
बाथरुम आणि वॉशरूम सारखी ओलसर ठिकाणे वेळोवेळी जंतुनाशकांनी स्वच्छ करा. धूळ घालवण्यासाठी बेडशीट, कार्पेट आणि उशाचे कव्हर कोमट पाण्याने धुवा आणि नीट वाळवा. दम्याचे रूग्ण नियमित वापरत असणारे कपडेदेखील नियमित स्वच्छ ठेवा. कुठेही धूळ साचू देणं तुम्हाला महागात पडू शकते.
प्राण्यांपासून लांब
घरामध्ये पाळीव प्राणी नाहीत याची खात्री करा कारण ते देखील दम्यास कारणीभूत ठरु शकतात. मांजर वा कुत्र्यांचे केस अथवा कोणत्याही प्राण्यांची विष्ठा यापासून दम्याच्या रूग्णांना अधिक त्रास होतो. पावसाळ्यात हा त्रास अधिक प्रमाणात दमटपणामुळे वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांनी प्राण्यांपासून लांब राहणे अधिक योग्य आहे
हेदेखील वाचा – लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि लक्षणे
अॅलर्जीपासून रक्षण
घर स्वच्छ आणि धूळविरहीत ठेवा. ज्या भागात परागकणांची संख्या जास्त आहे आणि हवेची गुणवत्ता खराब आहे अशा भागात जाऊ नका कारण हे घटक तुमच्या फुफ्फुसांना घातक ठरु शकतात. अॅलर्जीपासून स्वतःचे रक्षण घरी परतल्यावर लगेल कपडे बदला. ज्यामुळे तुम्हाला पावसाळ्यात जास्त त्रास होणार नाही
धुम्रपान टाळा
धुम्रपान करणे ठरू शकते घातक
घरी धूम्रपान टाळा किंवा जे धूम्रपान करतात (निष्क्रिय धुम्रपान) त्यांच्या आसपास राहणे टाळा. आसपास राहणे ज्याला पॅसिव्ह स्मोकिंग असं म्हटलं जातं हेदेखील दम्याच्या रुग्णांसाठी घातक ठरतं. विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात धुराचा त्रास होतो. त्यामुळे धुम्रपान करणे वा अशा व्यक्तींच्या संगतीत राहणे टाळा.
औषधांचे सेवन
डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या आणि इनहेलर कायम जवळ ठेवा. अल्कोहोलचे सेवन टाळा आणि जंक फूड, मसालेदार पदार्थ, हवाबंद डब्यातील आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. नियमित आरोग्य तपासणी करा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसंच स्वतःच्या मनाने अजिबात कोणतेही औषध घेऊ नका.
लक्षात ठेवा
शरीराची काळजी व्यायाम करून घेणे आवश्यक
घरच्या घरी व्यायाम करा. योगा, जिमिंग किंवा चालणे यासारख्या व्यायाम प्रकाराची निवड करा. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड रहा. संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फ्लू आणि न्यूमोनिया लसीकरण करुन घ्या. दम्याचे रूग्ण असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केल्यास पावसाळ्यात नक्कीच त्रास होणार नाही.