महिलांमधील ऑटोइम्यून आजार: लैंगिक असमानता
महाराष्ट्रात राहणाऱ्या एक आई, 35 वर्षांच्या श्रीमती मीना काही महिन्यांपासून सततच्या सांधेदुखीने त्रस्त होत्या. घरकामामुळे त्रास होत असेल असे वाटून सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले पण त्रास असह्य होऊ लागल्यावर वैद्यकीय सल्ला घेतला आणि निदान करण्यात आले की त्यांना र्हुमॅटॉईड संधिवात rheumatoid arthritis (RA) झाला होता. भारतातील बहुसंख्य महिलांच्या बाबतीत आज नेमके हेच घडत आहे.संबंधित माहिती डॉ आलाप ख्रिस्ती, व्हाईस प्रेसिडेंट आणि सायन्टिफिक बिझनेस हेड – क्लिनिकल केमिस्ट्री,ग्लोबल रेफरन्स लॅबोरेटरी, मेट्रोपॉलिस हेल्थकेयर लिमिटेड मुंबई यांच्याकडून घेण्यात आली आहे.
व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती जेव्हा त्याच शरीरातील पेशींवर हल्ला करते तेव्हा ऑटोइम्यून आजार होतात. मुंबईमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, ज्यांच्या तपासणीमध्ये ऑटोइम्यून मार्कर्स पॉझिटिव्ह आले अशांपैकी 70% महिला होत्या. जागतिक आकडेवारी देखील हाच ट्रेंड दर्शवते, जगभरात ऑटोइम्यून आजारांनी त्रस्त व्यक्तींपैकी 80% महिला असतात. भारतामध्ये र्हुमॅटॉईड संधिवात, सिस्टिमिक ल्युपस ऐरिथमॅटोसस (एसएलई) आणि ऑटोइम्यून थायरॉईड विकार हे खास करून महिलांमध्ये आढळून येतात. अधिक चांगल्या आरोग्य देखभाल सेवासुविधा पुरवणे किती गरजेचे आहे हे यावरून दिसून येते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: राज्य सरकारच्या जे. जे रुग्णालयात पहिल्यांदाच अर्धा गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी
शरीरामध्ये ऑटोइम्यून आजार आहेत अथवा नाही हे तपासण्यासाठी आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रयोगशाळा तपासण्या उपलब्ध आहेत. गोल्ड स्टॅन्डर्ड स्क्रीनिंग तपासण्यांपैकी एक म्हणजे अँटीन्यूक्लियर अँटीबॉडी टेस्ट, ही जर पॉझिटिव्ह आली तर खात्री करून घेण्यासाठी ELISA आणि इम्युनोब्लॉट तंत्र वापरून तपासण्या केल्या जातात. या तपासण्यांमुळे ऑटोइम्यून आजारांचे विविध प्रकार तपशीलवारपणे समजून घेण्यात मदत झाली आहे.
महिलांमध्ये ऑटोइम्यून आजार जास्त प्रमाणात आढळून येतात याची अनेक कारणे आहेत. हार्मोन्स, खास करून इस्ट्रोजेन हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे. इस्ट्रोजेन रोगप्रतिकार यंत्रणेचे कार्य वाढवते, त्यामुळे ती अतिक्रियाशील बनू शकते. पौगंडावस्थेत, गरोदर असताना आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्स वरखाली होत असल्याने हा धोका बळावतो. उदाहरणार्थ, काही महिलांना गरोदर असताना ऑटोइम्यून लक्षणांपासून आराम मिळतो तर काहींना, खासकरून ज्यांना ल्यूपस आहे अशा महिलांचा त्रास वाढतो.
आनुवंशिकतेची भूमिका देखील खूप महत्त्वाची असते. महिलांमध्ये दोन एक्स क्रोमोसोम्स असतात, ज्यामध्ये अनेक रोगप्रतिकार-संबंधित जीन्स असतात, त्यामुळे त्यांच्याबाबतीत ऑटोइम्यून आजार होण्याची शक्यता बळावते. या उलट, पुरुषांमध्ये फक्त एक एक्स क्रोमोसोम असतो, त्यामुळे त्यांच्याबाबतीत हा धोका कमी असतो.
भारतामध्ये आरोग्य देखभालीमध्ये आढळून येणाऱ्या लैंगिक समानतेची अनेक प्रमुख कारणे सांस्कृतिक व सामाजिक आहेत. अनेक महिला, खासकरून ग्रामीण भागातील महिला, आरोग्यापेक्षा जास्त महत्त्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांना देतात, त्यामुळे तब्येतीचा काही त्रास जरी होत असेल तरी वैद्यकीय मदत घेण्यात बराच उशीर होतो. अनेक भागांमध्ये पुरेशा वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध नसतात, त्यामुळे ऑटोइम्यून आजारांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांमध्ये अनेक अडचणी उद्भवतात.
अनेक पर्यावरणीय घटकांमुळे देखील ऑटोइम्यून आजारांचे प्रमाण वाढत आहे. संशोधनातून आढळून आले आहे की, प्रदूषके, प्रक्रिया करण्यात आलेले खाद्यपदार्थ आणि बऱ्याच काळापासूनचे ताणतणाव ऑटोइम्यून आजार वाढवतात. महिलांवर विविध सामाजिक बंधने असतात, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आजारांमधील गुंतागुंत अधिक वाढते.
जागतिक पातळीवरील सर्वात जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या गंभीर आजारांमध्ये कर्करोग आणि हृदयविकारांनंतर तिसरा क्रमांक ऑटोइम्यून आजारांचा आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 25 ते 31 मिलियन व्यक्ती या आजारांनी त्रस्त आहेत. भारतामध्ये जवळपास 1 % लोकसंख्येला र्हुमॅटॉईड संधिवात, 12 % लोकांना ऑटोइम्यून थायरॉईड विकार आहेत आणि महिलांच्या बाबतीत हा धोका खूप जास्त आहे.
महिलांमध्ये ऑटोइम्यून आजारांचे प्रमाण वाढत असल्याच्या समस्येचे प्रभावी निवारण करण्यासाठी सर्वसमावेशक सार्वजनिक आरोग्य उपक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. आजाराचे लवकरात लवकर निदान आणि त्यावर लवकरात लवकर उपचार ही गुरुकिल्ली आहे, या आजारांचे दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. ऑटोइम्यून आजारांच्या लक्षणांबाबत महिलांना जागरूक करून आणि तब्येतीच्या कोणत्याही तक्रारीसाठी लवकरात लवकर वैद्यकीय मदत व सल्ला घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन लक्षणीय परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे.
हे देखील वाचा: सतत अंजीर खाणे ‘या’ व्यक्तींसाठी ठरेल घातक, उद्भवतील आरोग्यासंबंधित गंभीर समस्या
आरोग्य देखभाल सेवासुविधांमध्ये, खासकरून ग्रामीण भागांमध्ये सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. महिलांना आरोग्य सेवासुविधा सहज आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यास त्यांना आवश्यक ती देखभाल मिळू शकेल. समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचून ऑटोइम्यून आजारांविषयी जागरूकता वाढवल्यास अनेक गैरसमज दूर होतील आणि महिला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यात सक्षम बनतील.
थोडक्यात सांगायचे झाले तर, महिलांमध्ये ऑटोइम्यून आजारांचे प्रमाण जास्त असण्यामागची कारणे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रभावी आरोग्य देखभाल उपाययोजना करण्यासाठी देखील ते उपयोगी ठरू शकेल. विशेष सार्वजनिक आरोग्य धोरणे राबवून या समस्यांचे निवारण करून आपण असंख्य महिलांना गरजेची असलेली देखभाल व मदत पुरवून त्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणू शकू.






