फोटो सौजन्य - Social Media
रमन बदलापूरला राहतो. दादरला एका कंपनीत तो कामाला होता. दुपारची शिफ्ट करून तो अगदी मध्यरात्री घर परतत असे. पण तो दिवस त्याच्यासाठी फार खराब होता. त्याला ऑफिसमधून निघायला फार उशीर झाला होता. १२ ते साडे १२ च्या दरम्यान, तो घराकडे निघाला. जवळजवळ डिड तासांच्या प्रवासानंतर तो बदलापूर रेल्वे स्थानकावर येऊन पोहचला. सगळं काही सुरळीत सुरु होतं पण मध्यरात्रीच्या वेळीही बऱ्यापैकी रिक्षा असतात. पण त्यावेळी त्याला स्थानकाबाहेरही प्रचंड शुकशुकाट जाणवत होता. स्थानकाबाहेर एक माणूस नव्हता. रिक्षा तर लांबची गोष्ट! तो घराकडे चालत निघाला, इतक्यात त्याला एक रिक्षावाल्याने हॉर्न दिला.
रमन त्या रिक्षामध्ये चढला. रिक्षावाल्याला ठिकाण सांगत तो शांत बसला. रिक्षाच्या बाहेर पाहतो तर काय? रस्त्यावरच्या विजेचे खांबही बंद होते. त्या काळोखातून मार्ग काढत रिक्षा सुसाट होती. रमनने रिक्षावाल्याला विचारले असता रिक्षावालाही काही उत्तर द्यायला तयार नाही. कुणा रागात तो रिक्षा चालवत होता, देव जाणे? अचानक अर्ध्या रस्त्यात त्याने रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याने रागात त्याला रिक्षातून उतरायला सांगितले. रमनने त्याला प्रश्न केला पण रिक्षावाल्याने कसलाही उत्तर न देता, रिक्षा मागे वळवली. रमन त्या काळोखात मार्ग काढत भरभर चालत सुटला. त्याचे घर त्या ठिकाणापासून काही फार अंतरावर नव्हते. पण अचानक त्याला लघवीला झाली.
शेजारीच एक सार्वजनिक टॉयलेट होते. तो तिथे काम करत असताना त्याला टॉयलेटच्या मागे असलेल्या विहिरीतून विचित्र आवाज येत होते. कुणी तरी विहिरीतून पाणी काढतोय आणि तेच पाणी पुन्हा त्या विहिरीत ओततोय. रमन टॉयलेट बाहेर आला. समोर पाहतो तर काय? एक सोळा-सतरा वर्षांची सुंदर मुलगी! एकटक त्याच्याकडे पाहत होती. त्या ८ किमीच्या त्या प्रवासात त्याने रिक्षावाल्यानंतर हीच एक दुसरी व्यक्ती जी नजरेस आली. त्या मुलीविषयी त्याच्या मनात चिंता तर होतीच आणि भीतीही होती. त्याने तिचे पाय पाहिले, पण पाय सरळच होते.
त्या मुलीच्या डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा होता आणि त्या मुलीला पाहून रमनच्या डोक्यावर टेन्शन! मुलगी त्याच दिशेने चालू लागली, ज्या दिशेने रमनचे घर आहे. हा पठ्ठया त्या मुलीच्या मागे-मागे चालत होता. ते दोघे चालत-चालत त्यांच्या सोसायटीच्या जवळ पोहचतात. तेव्हा एक शेजारच्या सोसायटीमधला ओळखीचा व्यक्ती तिथे एका बाकड्यावर बसलेला असतो. तो रमनला आवाज देतो. रमनही त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. रमन त्याच्या बिल्डिंगमध्ये पोहचतो. तो आत जाताच त्याला प्रश्न पडतो “त्या अल्पवयीन मुलीचं काय? ती इतक्या रात्री कुठे जाईल?” तिच्या काळजीपोटी तो मागे वळतो आणि पाहतो तर काय? त्या परिसरात कुणीच नव्हतं. दूरदूरपर्यंत ती मुलगी दिसत नव्हती.
रमन घरी जाऊन शांत झोपतो. दुपारी पुन्हा कामाला जायला निघतो पाहतो तर काय? शेजारच्या सोसायटीच्या गेटसमोर एक बॅनर लागलेले असते, जिथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असतो याची नोंद असते. मृत्यू दोन दिवसांअगोदर झालेला असतो आणि हा तोच व्यक्ती होता, ज्याने काल रमनला आवाज दिला होता. रमन पूर्ण टेन्शनमध्ये जातो. तरी तो घराकडे न परतता ऑफिसला निघतो. त्यात आणखीन एक त्याला शॉक मिळतो. रात्री ज्या ठिकाणी त्याला रिक्षाने अर्ध्यात सोडले होते. त्या ठिकाणी एका रिक्षाचे accident झाले असते. रिक्षाचा अगदी चेंडा मेंढा झालेला असतो. स्थानकावर पोहचताच, रिक्षा स्टॅण्डवर एक बॅनर लागलेला असतो. हा त्या रिक्षावाल्याचा मृत्यूची बातमी देणारा बॅनर असतो. त्यावरचा फोटो पाहून रमन आणखीन धक्क्यात जातो. कारण हा तोच रिक्षावाला असतो ज्याने त्याला काल अर्ध्यात त्या Accident च्या ठिकाणापर्यंत सोडले असते.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)