फोटो सौजन्य - Social Media
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्याची त्वचा विशेषतः जास्त त्रासदायक ठरते. गरम वाऱ्यांमुळे, धूळ आणि घाम यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि चिकट बनते. अशा स्थितीत त्वचेला योग्य काळजीची आवश्यकता असते. या दिवसांत पिंपल्स, डाग-धब्बे, सुरकुत्या आणि टॅनिंगसारख्या समस्या वाढतात. बाजारात मिळणाऱ्या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. यामध्ये शुद्ध नारळ तेल एक उत्तम पर्याय आहे, जो अनेक त्वचा समस्यांवर सोपा आणि प्रभावी उपाय देतो.
नारळ तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. यामध्ये विटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि लॉरिक अॅसिडसारख्या घटकांचा समावेश असतो, जे त्वचेच्या पेशींना पोषण देतात आणि त्यांचे संरक्षण करतात. विटॅमिन ईमुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक तरुण दिसते. अँटी-बॅक्टेरियल घटकांमुळे पिंपल्सच्या समस्या कमी होतात. विशेषतः लॉरिक अॅसिड त्वचेवरील जंतूंना नष्ट करतं आणि त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतं.
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचा आतून कोरडी होण्याची शक्यता असते. नारळ तेल त्वचेच्या आतपर्यंत पोहोचून नमी टिकवून ठेवतं आणि त्वचेला उजळ व मृदू बनवतं. याशिवाय, अधिक उन्हात फिरल्यानंतर चेहरा जळतो किंवा लालसर होतो, अशा वेळी नारळ तेल लावल्यानं त्वचेला थंडावा मिळतो आणि सूज कमी होते. त्यामुळे सनबर्नपासूनही नैसर्गिकरित्या संरक्षण मिळतं.
नारळ तेल लावण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करून कोरडा पुसावा. त्यानंतर २–३ थेंब शुद्ध नारळ तेल हातावर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने गोलाकार मालिश करावी. हे तेल रात्रीभर त्वचेवर ठेवावं आणि सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवावा. नियमितपणे ही पद्धत वापरल्यास त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण राहते. नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर नारळ तेल हे एक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय आहे, जे केवळ सौंदर्य टिकवून ठेवत नाही, तर त्वचेला आतूनही आरोग्य देतो.