Ajit Pawar Funeral LIVE Updates in Marathi: अजित पवार यांना आज अखेरचा निरोप
29 Jan 2026 08:57 AM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या मूळ गावी, काटेवाडी येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. पहाटेपासूनच लाडक्या 'दादां'ना शेवटचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली असून, सर्व नागरिक शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून दर्शन घेत आहेत.
या प्रसंगी पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित असून, रोहित पवार स्वतः गेटजवळ थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रथम महिलांना दर्शनासाठी सोडण्यात आले. आपल्या नेत्याला निरोप देताना अनेक महिला आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले आहेत.
29 Jan 2026 08:51 AM (IST)
"अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नसून ते जनतेचे लाडके लोकनेते होते. आपल्या कर्तव्यनिष्ठेने त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा स्वभाव राज्याला प्रगतीपथावर नेणारा होता. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे," अशी भावूक प्रतिक्रिया जैन दिगंबर पंथाचे क्रांतिकारी राष्ट्रीय संत आचार्य गुप्तीनंदी महाराज यांनी व्यक्त केली.
नाशिकच्या मनमाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आचार्य गुप्तीनंदी महाराजांनी अजितदादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, "दादांचे जैन समाजासह सर्व जाती-धर्माच्या लोकांशी अत्यंत सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. ज्या पद्धतीने हा विमान अपघात झाला, तो पाहता ही घटना संशयास्पद वाटते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी केंद्र व राज्य सरकारने करावी."
29 Jan 2026 08:38 AM (IST)
आपल्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत दु:ख व्यक्त केले जात आहे. सगळीकडे शांतता पसरली आहे.
29 Jan 2026 08:15 AM (IST)
अजित पवारांवर आज अंत्यसंस्कार केले जाणार असल्याने अनेक नेतेमंडळी बारामतीत उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्री हजर राहणार असल्याने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
29 Jan 2026 08:05 AM (IST)
अजित पवारांच्या अपघाती निधनाची बातमी समजातच सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये राज्यासह देशभरातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
29 Jan 2026 07:55 AM (IST)
अपघातानंतर घटनास्थळावरून अजित पवारांसह पाचही मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह निवासस्थानी पोहोचवण्यात आले. अजित पवारांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले, जिथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
29 Jan 2026 07:45 AM (IST)
अजित पवारांवर सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बारामतीत चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
29 Jan 2026 07:35 AM (IST)
Ajit Pawar Funeral उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी थोड्याच वेळात त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय काटेवाडीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पार्थिव घरी पोहोचल्यानंतर नातेवाईक आणि कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेता येईल, त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे नेण्यात येईल.
29 Jan 2026 07:28 AM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहिलेला चेहरा होते. बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते बारामतीसाठी जगले आणि त्यांचा मृत्यूही बारामतीतच झाला. त्यांना राज्यात ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि कर्तृत्वाची ओळख होती. बुधवारीही ते पंचायत निवडणुकीच्या जाहीरसभांना संबोधित करण्यासाठी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते.
बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती येथील गोजुबावी येथे लँडिंगच्या दरम्यान त्यांचे विमान कोसळून झालेल्या भीषण स्फोटात अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला.
गेली अनेक दशके राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिलेल्या एका मास लीडरच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






