दुधी तशी रोजच्याच पहाण्यातली फळभाजी. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि दुधी भोपळा बाजारात खूप बघायला मिळतो, पण काही लोकांना दुधी अजिबात आवडत नाही. तर खातानाही नाक मुरडतात. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे. जाणून घेऊया दुधी खाण्याचे 5 महत्त्वाचे फायदे.
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठीही दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. दुधीमध्ये व्हिटॅमिन-सी, सोडियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. दुधी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते.
दुधी आहारात घेतल्याने हाडे मजबूत होतात. कारण त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सारखे पोषक घटक आढळतात, हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा फायदा होतो.
दुधी भोपळा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, याबद्दल अनेकांना माहीत नाही. दुधी खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल संतुलित राहते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
याशिवाय केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येतही तुम्हाला फायदा होऊ शकतो. केसांसाठी दररोज एक ग्लास दुधीचा रस प्यायल्यास फायदा होतो. केसांची वाढ चांगली होऊन केस अकाली पांढरे होत नाहीत.
बदलत्या जीवनशैलीत बहुतेक लोक ताण-तणावाखाली काम करत असतात. त्यामुळे अनेक आजार सुरू होऊ शकतात. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र, दुधी खाल्ल्याने तणाव देखील कमी होतो. त्यामुळे आजपासून दुधी भोपळ्याचा आहारात नक्की समावेश करा.