पोटाचा कॅन्सर होऊ नये यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
पोटाचा कर्करोग किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. याची मूलभूत कारणे जीवनशैली, आहार आणि संसर्गामध्ये असतात. जेनेटिक कारणे देखील असतात पण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही या आजाराचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी करू शकता. पोटाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी आणि एकंदरीत चांगले जीवन जगता यावे यासाठी पुढील प्रमाणे उपाययोजना अवश्य कराव्यात, यासाठी डॉ. प्रसाद पांडे, कन्सल्टंन्ट, गॅस्ट्रोइंटेस्टिनल आणि हेपॅटोपॅनक्रियाटोबिलियरी सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे
पोटाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्या
भरपूर ताजी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने पचन आरोग्य उत्तम राहते व पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. अशा आहारामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर मुबलक असतात, हे पदार्थ पोटातील लायनिंगला दाह, सूज येण्यापासून व पेशींचे नुकसान होण्यापासून रक्षण करतात. भरपूर मीठ असलेले पदार्थ, लोणचे आणि स्मोक्ड अन्नपदार्थ खाणे टाळावे, यातील प्रिझर्व्हेटिव्ज, नायट्रेट्स आणि नायट्राइट्समुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
Cancer Awareness Month: केवळ पुरूषांनाच लक्ष्य करतात ‘हे’ कॅन्सर, 7 लक्षणे दिसताच डॉक्टरांना गाठाच
प्रक्रिया केलेले पदार्थ आणि लाल मांस यांचे सेवन प्रमाणात करावे
प्रक्रिया केलेले मांस – स्टफ्ड बेकन, सॉसेजेस आणि हॅम यांचे खूप जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यातील कार्सिनोजेनिक कम्पाऊंड्समुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. लाल मांसाचे सेवन कमीत कमी प्रमाणात करावे, त्याऐवजी मासे, पोल्ट्री आणि प्लान्ट प्रोटीन्स यासारख्या लीन प्रोटीन्सचा आहारात समावेश केल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहण्यात मदत मिळते. प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाण्यापेक्षा घरी बनवलेले ताजे अन्न रोज खाणे हा देखील पोटाचा कर्करोग रोखण्याचा उपाय आहे.
वजन नियंत्रणात ठेवावे, नियमितपणे व्यायाम करावा
स्थूलपणा हे अनेक प्रकारच्या कर्करोगांचे कारण ठरू शकते, त्यामध्ये पोटाच्या कर्करोगाचा देखील समावेश आहे. शरीरात खूप जास्त चरबी साठलेली असल्यास शरीरात सूज आणि दाह निर्माण होतो, हार्मोन्सच्या सामान्य कार्यात अडथळे निर्माण होतात, परिणामी ऑन्कोजेनिक बदल होऊ लागतात. जलद चालणे, सायकलिंग किंवा योगासने यासारखे व्यायाम रोजच्या रोज करून स्वतःला फिट ठेवल्याने वजन निरोगी राहते, शिवाय पचन व्यवस्थित होते व गंभीर आजारांपासून बचाव होतो. शारीरिक व्यायाम आणि संतुलित आहार ही एकंदरीत आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
धुम्रपान आणि अतिरिक्त प्रमाणात अल्कोहोल सेवन करणे टाळावे
धूम्रपान आणि अतिरिक्त प्रमाणात अल्कोहोल सेवन हे पोटाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतात. सिगरेटच्या धुरातील कार्सिनोजेन पोटातील लायनिंगचे नुकसान करतात. अतिरिक्त प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने पोटातील लायनिंगचे नुकसान होते, त्यामुळे इतर हानिकारक कार्सिनोजेन पोटाला सहज त्रासदायक ठरू शकतात. धूम्रपान पूर्णपणे बंद करून व अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी करून पोटाचा व इतर कर्करोग देखील टाळता येऊ शकतात.
एच. पायलोरी संसर्गावरील उपचार
एच. पायलोरी संसर्ग हा विषाणूचा प्रकार पोटामध्ये अल्सर होण्यास कारणीभूत ठरतो. पोटाचे काही कर्करोग याचाच एक परिणाम म्हणून होतात. या विषाणू संसर्गासाठी नियमितपणे तपासणी केल्यास गंभीर सूज आणि दाह होणे, अधिक गुंतागुंत होणे टाळले जाऊ शकते. पोटाच्या तक्रारी सतत होत असतील किंवा पोटात सतत दुखत असेल, पोट फुगणे किंवा मळमळणे असे त्रास सतत होत असतील तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ
आपण जे खातो ते सुरक्षित आणि स्वच्छ असेल तर विषाणू संसर्गाचा व पोटाचा कर्करोग होण्याचा धोका टळतो. फळे व भाज्या नीट धुतलेल्या असाव्यात, मांस पूर्णपणे शिजलेले असावे व अन्न जिथून येते ती जागा प्रदूषित किंवा अस्वच्छ नसावी. अन्नपदार्थ साठवून ठेवताना विशेष काळजी घ्यावी, स्वयंपाक करताना स्वच्छतेचे पालन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होणे टाळले जाऊ शकते.
ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध
नियमितपणे आरोग्य तपासणी आणि स्क्रीनिंग
कुटुंबात इतर कोणाला याआधी पोटाचा कर्करोग आणि इतर आजार झालेले असतील तर नियमितपणे मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासण्या आणि स्क्रीनिंग करून घेतल्यास आजार लवकरात लवकर लक्षात येऊ शकतो. एन्डोस्कोपिक इन्व्हेस्टिगेशन, स्टूल टेस्टिंग आणि इतर अनेक डायग्नोस्टिक उपाय करून गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. लवकरात लवकर उपचार करून घेणे खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे आजार बरा होऊन समाधानकारक परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.
पोटाचा कर्करोग ही संपूर्ण जगभरातील एक गंभीर समस्या आहे, पण जीवनशैलीबाबत अधिक जागरूक राहून याचा धोका कमी करता येणे शक्य आहे. योग्य आहार घेऊन, सक्रिय राहून, हानिकारक गोष्टी टाळून आणि योग्य वेळी योग्य वैद्यकीय काळजी घेऊन तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. आजार, त्याची कारणे आणि तो टाळण्याचे उपाय याविषयी जागरूक राहून पोटाच्या कर्करोगाच्या समस्येचे ओझे कमी करणे शक्य आहे.