फोटो सौजन्य - Social Media
वजन वाढणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या पद्धतींनी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही डाएट पद्धती लांब पल्ल्यात शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. नवीन संशोधनानुसार कीटो डाएटसारख्या कमी कार्बोहायड्रेट असलेल्या आहारामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कोलोरेक्टल कॅन्सरचे प्रमाण विशेषतः तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. संशोधनानुसार, लो-कार्ब डाएटमुळे आतड्यांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरशी संबंधित विषारी घटक वाढतात. सामान्यतः लो-कार्ब डाएट मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करते आणि वजन झपाट्याने कमी करण्यास प्रभावी मानली जाते. मात्र, काही लो-कार्ब डाएटमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे भूक कमी होते आणि शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते. परंतु, अशा आहाराचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात.
संशोधनानुसार, कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच कमी केल्यास आतड्यांमधील ई. कोली बॅक्टेरिया कोलीबैक्टिन नावाचा विषारी घटक तयार करतो. या विषारी घटकामुळे कोलनमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात, ज्यामुळे ट्यूमर होण्याची शक्यता वाढते. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये असे आढळून आले की, पूर्णपणे कार्बोहायड्रेट टाळल्यास कोलन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. मात्र, हे निष्कर्ष अद्याप मानवावर चाचणीद्वारे सिद्ध व्हायचे आहेत.
संशोधनासाठी तीन प्रमुख जिवाणूंचा अभ्यास करण्यात आला – बॅक्टेरॉइड्स फ्रॅगिलिस, हेलिकोबॅक्टर हेपेटिकस आणि ई. कोली स्ट्रेन NC101. हे जिवाणू आतड्यांमध्ये सूज निर्माण करतात आणि कॅन्सरसाठी पोषक वातावरण तयार करतात. विशेषतः ई. कोली NC101 हा बॅक्टेरिया ६०% कोलोरेक्टल कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आढळतो. उंदरांवर झालेल्या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की, कमी कार्बोहायड्रेट असलेले आहार घेतलेल्या उंदरांमध्ये कोलीबैक्टिन हा विषारी घटक अधिक प्रमाणात आढळला, ज्यामुळे त्यांच्या कोलन सेल्समध्ये डीएनएचे नुकसान झाले आणि ट्यूमर वाढला.
अर्थात, याचा अर्थ असा नाही की खूप जास्त कार्बोहायड्रेट खाणेही सुरक्षित आहे. अतिरीक्त कार्बोहायड्रेटमुळे वजन वाढणे, ब्लड शुगर नियंत्रण बिघडणे, टाईप-२ डायबेटिस आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणत्याही फडतूस डाएटचा अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे हा सर्वोत्तम उपाय आहे. योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि चांगले फॅट्स असलेला आहार घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहू शकते आणि अनावश्यक धोके टाळता येतात.