दिवाळीच्या फराळाने त्रास झाल्यास घरगुती उपाय (फोटो सौजन्य - iStock)
सणाच्या उत्साहात आपण अनेकदा मनसोक्त तळलेले पदार्थ खातो, पण हे पोटासाठी त्रासदायक ठरू शकते. जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. जर तुम्हालाही जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर काही घरगुती उपाय आराम मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. यासाठी काही घरगुती उपाय आपल्या आई-आजीकडूनही सांगण्यात येतात, आपण आज लेखातून हेच जाणून घेऊया.
ओवा आणि काळे मीठ हे पोटातील गॅस आणि जडपणा कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहेत. जास्त खाल्ल्यामुळे तुमचे पोट जड वाटत असल्यास, एक चमचा ओवा थोड्या काळ्या मिठात मिसळा, ते चांगले चावून खा आणि नंतर कोमट पाण्यासोबत प्या. ओवा पचनास मदत करतो आणि पोटातील जडपणा कमी करून गॅसपासून आराम देतो.
जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात गॅस किंवा सूज आली असल्यास, आले आणि लिंबाचा रस फायदेशीर ठरू शकतो. आल्याचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचा रस काढा. त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ किंवा सैंधव मीठ घाला. ते चाटल्याने पोटातील जळजळ शांत होऊ शकते आणि मळमळ किंवा जडपणापासून आराम मिळू शकतो.
जिरं आणि हिंग दोन्ही पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. जिऱ्यामुळे मेटाबॉलिझम वाढते, तर हिंग गॅस बाहेर टाकण्यास मदत करतो. एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालून चांगले उकळा आणि थोडे थंड झाल्यावर प्या. यामुळे अपचन आणि गॅसपासून आराम मिळेल.
याशिवाय बडीशेप आणि खडीसाखर पचनक्रिया सुधारतात. बडीशेप आणि खडीसाखरेचा थंडावा देणारा गुणधर्म आहे. त्यांचे सेवन केल्याने छातीत होणारी जळजळ कमी होते आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो. तुम्ही एक चमचा बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाऊ शकता, किंवा बडीशेप पाण्यात मिसळून त्याचा काढा बनवून पिऊ शकता.
तसंच जर तुम्ही भरपूर तळलेले पदार्थ खाल्ले असतील आणि पोटात जळजळ होत असेल, तर पोटाला आराम देण्यासाठी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड ताकात मिसळून प्या. ताक पोटाला थंडावा देते आणि अपचनापासूनही आराम देते. हे घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या






