फुफ्फुसावर दिवाळीनंतर प्रदूषणाचे काय परिणाम होतात (फोटो सौजन्य - iStock)
दिवाळीनंतरची हवा
दिवाळीनंतर दिल्ली, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरी भागांमध्ये हवेतील प्रदूषण, विशेषतः PM२.५ आणि PM१० अशा अतिसूक्ष्म कणांची (पार्टिक्युलेट मॅटर) पातळी धोकादायक प्रमाणात वाढते. हे कण 2.5 मायक्रॉनपेक्षाही लहान असल्यामुळे फुफ्फुसांच्या आत खोलवर शिरतात आणि रक्ताभिसरण संस्थेमध्येही प्रवेश करू शकतात. मागील वर्षांच्या आकडेवारीनुसार, वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) अनेकदा “गंभीर” पातळी ओलांडतो. हा निर्देशांक जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेच्या दहापट जास्त असतो.
दिवाळी संपल्यानंतरही प्रदूषण आणखी वाढलेले दिसते, कारण हवामानाचे काही घटक त्यात भर घालतात. थंडी, शांत वारे आणि वाढलेली आर्द्रता यांसारख्या स्थितीमुळे प्रदूषक घटक जमिनीच्या जवळ अडकून राहतात. धूर व धुके मिसळून तयार झालेले प्रदूषण पुढील अनेक दिवस टिकून राहते.
फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम
दिवाळीनंतरच्या प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. ज्या व्यक्तींना आधीपासूनच दमा, सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) किंवा ब्राँकायटिससारखे फुफ्फुसांचे आजार आहेत, त्यांच्यासाठी हा काळ खूप जिकिरीचा ठरू शकतो. इतकेच नव्हे तर, निरोगी व्यक्तींनाही खोकला, घशात जळजळ, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे जाणवू शकतात.
सूक्ष्म कणांच्या संपर्कात दीर्घकाळपर्यंत राहिल्यास श्वसनाचे जुनाट आजार वाढण्याचा, फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्याचा आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना सर्वात जास्त धोका असतो. दिवाळीनंतरच्या काही आठवड्यांमध्ये अस्थम्याचा त्रास वाढतो आणि श्वसनाचे संसर्ग वाढल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे बालरोग तज्ञांनी सातत्याने नोंदवले आहे.
काय आहेत उपाययोजना
सण पर्यावरण-स्नेही पद्धतीने साजरे करण्याबाबतची जागरूकता वाढत आहे, तरीही सर्वांनी मिळून कृती करणे आवश्यक आहे. फटाक्यांचा वापर कमी करणे, हरित फटाक्यांना प्रोत्साहन देणे आणि सामुदायिक स्तरावर सण साजरे करण्याला प्रेरित केल्याने हानिकारक वायूंचे उत्सर्जन लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकेल. सरकार देखील हवेची गुणवत्ता योग्य राहावी यासाठी प्रयत्न करत आहे, उत्सर्जनविषयक नियमांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली गेल्यास सुधारणांना अधिक वाव मिळेल.
दिवाळी म्हणजे अंधःकारावर मात करणाऱ्या प्रकाशाचा उत्सव. हा अर्थ आपल्या पर्यावरणापर्यंत पोहोचवून आता आपण अधिक जास्त जबाबदारीने सण साजरा करण्याची वेळ आली आहे, जेणेकरून दिव्यांचा हा उत्सव आपल्या आरोग्यावर कोणतीही वाईट छाया टाकू नये.






