फोटो सौजन्य - Social Media
तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की अगदी गोऱ्या लोकांचेदेखील गुडघे आणि कोपर तुलनेने काळे दिसतात? त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, ही अगदी सामान्य समस्या आहे आणि यामागे अनेक कारणं असू शकतात, जसं की त्वचेची रचना, कोरडेपणा किंवा त्या भागावर वारंवार होणारा दबाव. यामुळे त्वचा गडद होऊन दिसते. चला तर मग जाणून घेऊया यामागची कारणं आणि सोप्पे उपाय.
गुडघे आणि कोपर याठिकाणी शरीराच्या इतर भागांपेक्षा त्वचा जास्त जाडसर असते. ही त्वचा लवकर रापते आणि डल होते. सततच्या घर्षणामुळे किंवा दडपणामुळे हे भाग काळे पडण्याची शक्यता वाढते. आपण बसताना, झुकताना किंवा गुडघे टेकवून काम करताना या भागांवर जास्त भार येतो, त्यामुळे त्वचेला जखडण होते आणि रंग गडद होतो. शिवाय या भागांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असते. कोरडेपणामुळे डेड स्किन सेल्स जमा होतात आणि त्वचा अजून गडद आणि रफ दिसते.
सूर्यप्रकाशाचा देखील यावर मोठा परिणाम होतो. गुडघे आणि कोपर शरीराच्या उघड्या भागात असल्याने ते सहजपणे सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या संपर्कात येतात. यामुळे त्वचेमध्ये मेलानिनचं उत्पादन वाढतं आणि रंग गडद होतो. मेलानिन हा त्वचेला, केसांना आणि डोळ्यांना रंग देणारा नैसर्गिक घटक आहे. त्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्वचा काळी पडते. काहीवेळा काही विशिष्ट आजार जसे हायपरपिगमेंटेशन किंवा त्वचेचा जास्त कोरडेपणा हेसुद्धा गुडघे व कोपर काळे पडण्यामागे कारणीभूत असतात. जर ही समस्या खूप काळ राहिली तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
या कालेपणापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्पे उपाय करता येऊ शकतात. रोज गुडघे आणि कोपर यांना चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझर लावावं. त्वचेवर जमा झालेली मृत त्वचा काढून टाकण्यासाठी सौम्य स्क्रबचा वापर करावा. घराबाहेर पडताना या भागांवरही सनस्क्रीन लावणं विसरू नका. याशिवाय, नैसर्गिक उपाय म्हणून लिंबू आणि मधाचा लेप तयार करून या काळ्या भागांवर लावल्यास त्वचा उजळते. थोडी काळजी आणि नियमित स्किन केअरच्या सवयीने गुडघे व कोपरांची काळसरता कमी करणे नक्कीच शक्य आहे.