पाणीपुरी
भारताची फेमस पाणीपुरी देशात फार प्रसिद्ध आहे. फेमस स्ट्रीट फूडमध्ये पाणीपुरीचे नाव अग्रस्थानी आहे. भारतातच काय तर अनेक परदेशांनाही पाणीपुरीचे वेड लागले आहे. कुरकुरीत पुरी आणि त्यातील चटपटीत पाणी अशी ही आपली पाणीपुरी कोणाला आवडत नाही. पाणीपुरीला अनेक वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे की, पुचका, गोलगप्पा, फुलकी इ. मात्र तुम्हाला माहित आहे का? या पाणीपुरीचा शोध कोणी लावला आणि ही पाणीपुरी पहिल्यांना कोणी खाल्ली? नाही तर मग आज या बातमीतून जाणून घ्या.
प्राचीन भारतातील 16 महाजनपदांपैकी आहे मगध साम्राज्य, ज्याची राजधानी होती पाटलीपुत्र. पौराणिक मान्यतेनुसार, देशातील पहिली पाणीपुरी ही मगध काळात बनवली गेली. ही त्या काळातील गोष्ट आहे, ज्या काळात पोह्यांचा चिवडा, तिळ, लिट्टी चोखा इत्यादी बनवले जात होते. पाणीपुरी बनवणाऱ्या हुशार स्वयंपाकाचे नाव इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवले आहे.
महाभारतात या गोष्टीचा कोणताही उल्लेख केलेला नाही मात्र प्रचलित आख्यायिकेनुसार, जेव्हा द्रौपदी तिच्या सासरी पोहचली होती त्यावेळी पांडव वनवास करत होते आणि मग ती पाच पतींची पत्नी झाली. सहसा नवीन सून घरी आली की तिला काहीतरी गोडधोड बनवायला सांगितले जाते, मात्र पांडव जंगलात वनवास करत होते. तिथे संधानाची फार कमतरता होती. अशा स्थितीत पांडवांची आई कुंतीला द्रौपदी घर सांभाळू शकेल की नाही हे जाणून घ्यायचे होते. तेव्हा तिने द्रौपदीची एक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यांनतर कुंतीने द्रौपदीला उरलेली भाजी आणि एक चपाती होऊ शकेल इतका कणकेचा गोळा दिला आणि याने पाच पांडवांची भूक भूक शमवेल असे काहीतरी बनव, असे सांगितले. या परीक्षेत द्रौपदीने काय बनवले याचे उत्तर म्हणजे पाणीपुरी. यानंतर असे सांगितले जाते की, कुंतीला पाणीपुरीची चव इतकी आवडली की तिने या पदार्थाला अमरत्व प्राप्त करून दिले.

दरम्यान आता हीच पाणीपुरी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली आहे. भारतात तर जागोजागी पाणीपुरचे स्टॉल पाहायला मिळतात. कुरकुरीत पुरी आणि त्यातील आंबट तिखट पाण्याची चव सर्वांना फार आवडते. मात्र आता काळानुसार पाणीपुरीचे अनेक नवनवीन प्रकारे आले आहेत. आता अनेक प्रकारची पाणीपुरी बाजारात उपलब्ध आहे, जसे की, अज्वाईन पाणीपुरी, इमली पाणीपुरी, पुदिना पाणीपुरी… पाणीपुरी कोणतीही असोत ती आजही जगभरातील लोकांच्या मनात घर करून बसली आहे एवढं नक्की.






