फोटो सौजन्य - Social Media
राजेश अनेक दिवसांपासून या ट्रिपची तयारी करत होता. कामाचा ताण, रोजची धावपळ यापासून थोडा ब्रेक घ्यायचा म्हणून त्याने मित्रांसोबत व्हिलामध्ये पार्टी करण्याचा प्लॅन केला होता. सोशल मीडियावर फोटो, गाणी, दारू, नाईट पार्टी… सगळं ठरलं होतं. अखेर कर्जतजवळ एक फार्महाऊस मिळाला. तो परिसरातला सगळ्यात स्वस्त होता, पण पैशांपेक्षा मज्जा महत्त्वाची वाटत असल्याने कुणी फारसा विचार केला नाही.
दुपारी सगळे व्हिलामध्ये पोहोचले. मोठं गेट, आजूबाजूला झाडं, शांत वातावरण. सुरुवातीला सगळं अगदी नॉर्मल वाटत होतं. दुपार हसत-खेळत गेली. संध्याकाळी बार्बेक्यू, गाणी, नाच सुरू होता. रात्री १२ वाजेपर्यंत सगळं ठिक होतं. मात्र गावाबाजूचा भाग असल्याने थंडी खूप वाढली होती.
राजेशला थंडी वाजू लागल्याने तो शॉल घेण्यासाठी त्याच्या खोलीत गेला. कपाट उघडताच त्याला कुणीतरी मागे उभं असल्यासारखं वाटलं. क्षणभर अंगावर काटा आला, पण “थकवा असेल” असं म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. शॉल घेतला आणि आरशात पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या डोळ्यांसमोरच कपाटाचा दरवाजा आपोआप जोरात उघडला. राजेश दचकून मागे वळला… आणि लगेचच तोच दरवाजा प्रचंड आवाज करत बंद झाला.
घाबरलेला राजेश धावत हॉलमध्ये आला. मित्र हसत-गप्पा मारत होते. तोही त्यांच्यात बसला, स्वतःला सावरायचा प्रयत्न करत. रात्री पावणे एकच्या सुमारास सगळे झोपायला गेले. राजेश आणि त्याचा लहान भाऊ नमी एकाच खोलीत गेले.
नमीने फ्रेंच खिडकी उघडी ठेवायचा हट्ट धरला. “बाहेर मस्त हवा आहे,” तो म्हणाला. राजेशला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने काही बोललं नाही. TV लावून तो जागाच बसला. रात्री साधारण दीड-दोनच्या दरम्यान अचानक बाहेरून विचित्र आवाज येऊ लागले. कुणीतरी मार खात असल्यासारख्या किंचाळ्या, खिडकीवर नखं ओरबडल्यासारखे आवाज, सावल्यांची हालचाल… हे सगळं मिनिटामिनिटाला होत होतं.
राजेश अक्षरशः गोठून गेला. भीतीने त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते. नमी मात्र गाढ झोपेत होता. सकाळी चारच्या सुमारास राजेशने कसाबसा TV बंद केला आणि डोळे मिटले.
सकाळी उठल्यावर नमी आधीच जागा होता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, “दादा, तू रात्री मला ‘मोना… मोना…’ म्हणून का हाक मारत होतास? दोनच्या सुमारास मी उठलो. तुला पाहिलं तर तू गाढ झोपेत होतास. त्यानंतर मला झोपच लागली नाही.”
हे ऐकताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या वेळेला तो स्वतः पूर्णपणे जागा होता. त्यांनी ही घटना इतर मित्रांना सांगितली. आधी सगळ्यांना ते मजेशीर वाटलं… पण कुणाच्याच मनातून ती भीती गेली नाही.
त्याच दिवशी दुपारपर्यंत सगळ्यांनी व्हिला रिकामा केला. मज्जेसाठी गेलेले ते मित्र परतताना शांत, गप्प आणि आयुष्यभर न विसरणारी भीती मनात घेऊनच परतले.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)






