नवजात आईला ब्रेस्ट कॅन्सरचा त्रास कसा होऊ शकतो (फोटो सौजन्य - iStock)
स्तनपान ही एक नैसर्गिक, अनोखी आणि कोणताही पर्याय जिची जागा घेऊ शकत नाही अशी प्रक्रिया आहे, जी माता आणि बालक दोघांच्याही आरोग्याला असंख्य फायदे देऊ करते. नवजात बालकांच्या बाबतीत इष्टतम पोषण मिळण्याची, रोगप्रतिकारशक्ती अधिक बळकट बनविण्याची, मेंदूच्या विकासाला सहाय्य करण्याची, पचनशक्ती सुधारण्याची काळजी यातून घेतली जाते.
मातांसाठी ते काही विशिष्ट कर्करोगांचा, विशेषत: स्तन आणि अंडाशयाच्या कर्करोगांचा धोका कमी करण्याबरोबरच त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याच्या जपणूकीत योगदान देते, त्याचबरोबर ते माता आणि बालकामध्ये भावनिक बंधाची जोपासना करण्याच्या कामीही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. डॉ. कुंजल लीला, विभागप्रमुख व कन्सल्टन्ट इन सर्जिकल पॅथोलॉजी, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. यांनी याबाबत अधिक माहिती घेतली आहे.
चिंताजनक स्थिती
हे सु-स्थापित फायदे असूनही एक नवा चिंताजनक कल दिसून येऊ लागला आहे. तरुण मातांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे अर्थात ब्रेस्ट कॅन्सरच्या घटना वाढू लागल्या आहेत. गर्भधारणेस सक्षम वयातील स्त्रियांवर वाढत्या प्रमाणात परिणाम करत असलेल्या जीवनशैलीशी निगडित, जनुकीय आणि पर्यावरणीय घटकांचा एकत्रितपणे विचार केल्यास या विरोधाभासी परिस्थितीचे स्पष्टीकरण सापडू शकेल.
जोखीम वाढविणा-या काही प्रमुख घटकांपैकी एक म्हणजे प्रसुतीला विलंब होणे. वयाची तिशी उलटल्यावर पहिल्यांदा गर्भवती होणा-या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. त्याचबरोबर कमी वेळा गर्भधारणा आणि स्तनपानाचा कालावधी तुलनेने कमी असणे यामुळे लॅक्टेशन म्हणजे स्तन्य स्त्रवण्याचे काही संरक्षणात्मक परिणामही आणखी कमी होतात.
ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
आधुनिक जीवनशैलीतील निवडींचे पर्यायही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढविण्यामध्ये लक्षणीय भूमिका बजावतात. भरपूर काळापासून मनावर असलेला ताण, बैठ्या जीवनशैलीला पूरक सवयी, आहाराच्या चुकीच्या सवयी आणि आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्यांसारखी हार्मोन्सची औषधे वारंवार घेणे या सर्व गोष्टी धोका वाढविण्यामध्ये योगदान देतात. धूम्रपान आणि इतर अनारोग्यकारक वर्तणुकींमुळे हा धोका अधिकच वाढतो. धोका वाढविणा-या या छुप्या कारणांकडे बरेचदा डोळेझाक केली जाते, मात्र एकत्रितपणे त्यांचा, स्तनांच्या आरोग्यावर, विशेषत: लॅक्टेशनदरम्यान आणि त्यानंतर लक्षणीय प्रभाव पडतो.
काय आहेत आव्हानं
स्तनदा स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करताना काही आगळीवेगळी आव्हाने सामोरी येतात. स्तनपानादरम्यान स्तनांमध्ये घडून येणा-या काही शरीरक्रियात्मक बदलांमुळे गाठींसारखी असाधारण चिन्हे लक्षात येणे अधिक कठीण बनते. म्हणूनच तरुण मातांनी ब्रेस्ट कॅन्सरच्या छुप्या लक्षणांविषयी जागरुक असणे आणि वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी करून घेणे अधिकच महत्त्वाचे ठरते.
या चिन्हांमध्ये नेहमी हातांना जाणवण्याजोग्या गाठीचा समावेश असेलच असे नाही, पण स्तन सातत्याने दुखणे, लालसर होणे किंवा तेथील त्वचेला खड्डा पडणे, किंवा स्तनाग्रांतून रक्ताची छटा असलेला स्त्राव बाहेर येणे यांसारख्या लक्षणांच्या रूपात ती समोर येऊ शकतात. यापैकी कोणतेही लक्षण आढळून आल्यास, एखाद्या आरोग्यतज्ज्ञाकडून बारकाईने शारीरिक तपासणी करून घेणे व त्यानंतर गरज भासल्यास अल्ट्रासाउंड इमेजिंग आणि बायोप्सी करून घेणे अनिवार्य आहे.
कसे ओळखावे
लवकरात लवकर निदानाची शक्यता वाढावी यासाठी नेहमीच्या देखभालीच्या पलिकडे स्तनपान तपासण्यांचा आवाका विस्तारला पाहिजे. त्यात ब्रेस्ट कॅन्सरची चटकन न दिसून येणारी लक्षणे ओळखण्याचे शिक्षण व प्रजनन यंत्रणेशी संबंधिक कौटुंबिक पूर्वेतिहास आणि जीवनशैलीशी निगडित सवयींसह धोक्यास कारणीभूत ठरू शकणा-या व्यक्तिगत घटकांच्या मूल्यमापनाचा समावेश असला पाहिजे. या छुप्या चिन्हांविषयी नवमातांमध्ये जागरुकता वाढविल्याने वेळच्या वेळी निदानाची व अधिक चांगल्या परिणामांची हमी मिळण्यास मदत होऊ शकेल.
Breast Cancer चा सर्वाधिक धोका कोणाला? 40 व्या वर्षी स्वतःची तपासणी का करावी
कशी होते समस्या
कॅन्सरबरोबरच स्तनांच्या आरोग्याशी संबंधित इतरही अनेक समस्या खास स्तनदा मातांमध्ये आढळून येतात व त्या कॅन्सरच्या लक्षणांसारख्याच भासू शकतात. यात मास्टाटिस म्हणजे बहुतेकदा बॅक्टेरियल संसर्गामुळे स्तनाला सूज येण्याच्या समस्येचा समावेश होतो व त्यावर उपचार न केल्यास त्यामुळे स्तनांमध्ये गळू होऊ शकते.
ब्रेस्ट सिस्ट, दुग्धनलिका बंद होणे व त्याच्या परिणामी गॅलॅक्टोसील तयार होणे व लॅक्टेशनल अडेनोमा (स्तनपानाच्या काळात उद्भवणारा अघातक ट्यूमर) यांसारख्या इतर स्थितींमध्येही वेदना, सूज, लालसरपणा आणि स्तनाग्रांतून स्त्राव निघणे ही लक्षणे दिसू शकतात. अशा समस्यांचे ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांशी खूपच साधर्म्य असल्याने, अघातक व कर्करोगकारक स्थितींमध्ये फरक करण्यासाठी तपशीलवार मूल्यमापन आवश्यक आहे.