फोटो सौजन्य - Social Media
पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पनीर भारतात मोठ्या चवीने खाल्ले जाते. अनेक लोक नाश्त्यात, जेवणात आणि स्नॅक्समध्ये पनीरचा समावेश करतात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पनीरला अत्यंत Healthy मानले जाते.पनीरपासून शेकडो चविष्ट पदार्थ तयार करता येतात, म्हणूनच घरगुती जेवण किंवा खास मेजवानीसाठी पनीर हा पहिला पर्याय असतो.
तथापि, जरी पनीर पौष्टिक असले तरी प्रत्येकासाठी ते आरोग्यदायी असेलच असे नाही. काही लोकांसाठी पनीर खाणे त्रासदायक ठरू शकते आणि त्यामुळे त्यांना विविध आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणत्या लोकांनी पनीर खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात खावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
‘या’ लोकांनी पनीर खाणे टाळावे:
पनीरमध्ये प्रोटीन आणि इतर पोषणतत्त्वे भरपूर असली तरी त्याचा दर्जा आणि ताजेपणा महत्त्वाचा असतो. खराब किंवा बिघडलेले पनीर खाल्ल्यास फूड पॉइझनिंग होऊ शकते. बाजारातून आणलेले पनीर शिजवण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे गरजेचे आहे. ज्या लोकांना लॅक्टोज इनटॉलरन्स आहे, त्यांच्यासाठी पनीर खाणे अडचणीचे ठरू शकते. पनीरमध्ये लॅक्टोजचे प्रमाण तुलनेने कमी असले तरीही काही लोकांना ते सहन होत नाही. त्यामुळे अशा लोकांनी पनीर मर्यादित प्रमाणात खावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अती प्रमाणात पनीर खाल्ल्यास पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. प्रोटीन आणि फॅटच्या जास्त प्रमाणामुळे काही लोकांना अपचन, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हलक्या पचनक्षम आहारावर भर द्यावा. पनीरमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण तुलनेने जास्त असते. त्यामुळे हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब असणाऱ्या लोकांनी पनीर खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.
पनीर हे पोषणमूल्यांनी भरलेले असले तरी ते सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. ज्यांना फूड पॉइझनिंग, पचनासंबंधी तक्रारी किंवा हृदयविकाराचा धोका आहे, त्यांनी पनीर खाण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.