फोटो सौजन्य- pinterest
रामनवमी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण असून प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून देशभरात साजरा केला जातो. चैत्र मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतानुसार, या दिवशी अयोध्येच्या राजा दशरथ आणि माता कौशल्याच्या घरी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता. प्रभू श्रीराम म्हणजे भगवान विष्णू यांचा अवतार असून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हणतात.
रामनवमीच्या दिवशी मठ आणि मंदिरामध्ये यज्ञ आणि नर नारायण सेवा केली जाते. या दिवशी घरी पूजा आणि यज्ञ केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. माता सीतेला देवी लक्ष्मीचे स्वरुप मानले जाते. भगवान रामासोबत सीतेची उपासना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात ऐश्वर्य वाढते, अशी मान्यता आहे.
अयोध्या येथे रामजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. अयोध्येतील रामजन्मोत्सव पाहणे हे सर्वांत मोठ आकर्षण असते. यासाठी भाविक लाखो संख्येने अयोध्येला रवाना झालेले पाहायला मिळतात. अयोध्येच्या मंदिरात आकर्षक अशी सजावटही केली जाते. तर दुपारी 12 वाजता रामलल्लाच्या मस्तकी होणारा सूर्यटिळक अरथात सूर्य़किरणाचा अभिषेक पाहणे रामनवमीचे सर्वांत मोठे आकर्षणअसते. साधारण 4 मिनिट रामाच्या मस्तकावर सूर्यकिरणाचा अभिषेक केला जातो.
झारखंडची राजधानी रांची राममय झाली आहे. महावीर ध्वजाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. सर्वत्र रामजन्मोत्सवाची तयारी सुरु आहे. रांचीच्या मुख्य रस्त्यावर रामनवमीच्या उत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. रामनवमीनिमित्त बाजारात विविध प्रकारचे झेंडे आलेले पाहायला मिळतात.
रामनवमीचा उत्साह शिर्डीमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. शिर्डी साईबाबासंस्थानच्या वतीने 114 वा श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातोय. यावेळी रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी पायाने शिर्डीकडे मार्गस्थ होतात. यावर्षी 100हून अधिक पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होणार आहे. गुढीपाडव्याच्याआधीपासूनच अनेक भाविक मुंबईतून पायी यात्रा करत शिर्डीत दाखल होतात. या उत्सवाला शतकांची परंपरा असून महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादीं राज्यांमधून पालख्या शिर्डीत येतात.
राम नवमीच्या निमित्ताने मुंबई आणि पुण्यात विविध भागांमधून निघणाऱ्या सार्वजनिक यात्रा आणि मिरवणुका हे आकर्षणाचा विषय मानला जातो. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते.
जळगावमध्ये देखील राम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी मंदिरामध्ये कीर्तनाचे आयोजन केले जाते. तसेच प्रभु श्रीरामांच्या महाआरतीचे देखील आयोजन केले जाते. जळगावमधील सर्व मंदिरामध्ये रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
रामनवमीनिमित्त मलकापूरमध्ये भव्यशोभा यात्रेचे आयोजन केले जाते. तसेच इतरही सर्व मंदिरांमध्ये संस्थेच्या वतीने शोभायात्रेसह भजन, कीर्तन, प्रवचन, रामरक्षा स्तोत्र पठण असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)