श्रीकृष्ण म्हटलं की द्वारका, मथुरा आणि वृंदावन हे आठवतं. गोकुळात जन्मलेल्या श्रीकृष्णाची या ठिकाणची मंदिरं प्रसिद्ध आहे. मात्र तरी देखील असं एक मंदिर आहे जिथे श्रीकृष्णाचं हृदय धडधडतं असं म्हटलं जातं. ते मंदिर म्हणजे ओडीशामधील जगन्नाथपुरी मंदिर. भारतातील ओडिशा राज्यातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे एकमेव असे मंदिर मानले जाते, जिथे आजही श्रीकृष्णाचं हृदय धडधडत असल्याची श्रद्धा आहे. जगन्नाथपुरीचे अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. जसं की, मंदिराच्या कळसावरुन विमान किंवा पक्षी जात नाही जर का असं झालंच तर काहीतरी अनर्थ होईल अशी भाविकांची समजूत आहे. हिंदू पुराणांनुसार, श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर त्याचे शरीर पंचतत्त्वात विलीन झाले. मात्र हृदय इथेच राहिलं. हेच हृदय पुढे जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींमध्ये स्थापित करण्यात आले, अशी आख्यायिका आहे. यालाच ब्रह्मपदार्थ म्हटले जाते. जगन्नाथ मंदिरातील सर्वात रहस्यमय विधी असा एक विधी आहे ज्याला नवकलेवर असं म्हणतात.
नवकलेवर विधी हा श्रीकृष्णाच्या हृदयाशी संबंधित आहे. साधारणपणे 12 ते 19 वर्षांतून एकदा होणाऱ्या या विधीत, जुन्या लाकडी मूर्ती बदलून नवीन मूर्ती बनवल्या जातात. मात्र या वेळी ब्रह्मपदार्थ जुन्या मूर्तीतून नव्या मूर्तीत अत्यंत गुप्त पद्धतीने स्थानांतरित केला जातो. हा विधी मध्यरात्री, पूर्ण अंधारात पार पडतो. यामध्ये सहभागी होणाऱ्या सेवायतांचे डोळे बांधलेले असतात. अनेक सेवायतांनी या वेळी धडधडणाऱ्या हृदयाचा अनुभव आल्याचे सांगितले आहे, अशी श्रद्धा आहे. या मंदिराशी संबंधित इतरही अनेक रहस्ये प्रसिद्ध आहेत. मंदिराच्या शिखरावरील ध्वज वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो, मंदिरावरून पक्षी उडत नाहीत, तसेच मंदिराजवळ समुद्राच्या लाटांचा आवाज कमी झालेला जाणवतो.






