फोटो सौजन्य - Social Media
अलीकडे सोशल मीडियावर एक दावा प्रचंड व्हायरल होत आहे की इलेक्ट्रिक गाड्या चालवणारे किंवा त्यात प्रवास करणारे लोक आजारी पडत आहेत. त्यांना चक्कर, डोकेदुखी, थकवा आणि मळमळीसारख्या समस्या जाणवत आहेत. या मागचं कारण नक्की काय आहे, याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ आणि संशोधन काय सांगतात, ते जाणून घेऊया. काही ऑटोमोटिव्ह आणि हेल्थ एक्सपर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, इलेक्ट्रिक वाहनांमुळे काही प्रवाशांना मोशन सिकनेस (Motion Sickness) म्हणजे प्रवासात मळमळ, चक्कर यांसारख्या समस्या जाणवत आहेत. पारंपरिक इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये आवाज आणि इंजिनची कंपन असते, जी गाडीच्या हालचालीची जाणीव मेंदूला करून देते.
मात्र, इलेक्ट्रिक गाड्या अत्यंत शांत असतात आणि त्यामुळे मेंदूतील वेस्टिबुलर सिस्टम (जो शरीराचा तोल आणि हालचाल नियंत्रित करतो) याचा समन्वय विस्कळीत होऊ शकतो.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. रवि मेहता सांगतात की, “इलेक्ट्रिक वाहनांतील शांतता काही लोकांना सहन होत नाही. यामुळे त्यांना चक्कर, मळमळ, थकवा जाणवतो. हीच समस्या विमान किंवा वेगवान ट्रेनमध्येही काहींना जाणवते.” याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी आणि मोटरमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) तयार होतो. काही स्टडीजमधून असं समोर आलं आहे की, दीर्घकाळ अशा EMFच्या संपर्कात राहिल्यास डोकेदुखी, झोपेची समस्या आणि थकवा जाणवू शकतो.
तथापि, WHO (जागतिक आरोग्य संघटना) आणि ICNIRP (International Commission on Non-Ionizing Radiation Protection) यांचं म्हणणं आहे की, इलेक्ट्रिक वाहनांमधून निर्माण होणारा EMF स्तर सुरक्षित मर्यादेत असतो. तो मोबाईल, वाय-फाय किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांइतकाच असतो.
पर्यावरण आणि आरोग्य तज्ज्ञ डॉ. प्रिया शर्मा यांचं म्हणणं आहे की, “EMF मुळे आरोग्यावर परिणाम होतो, हा दावा अजून शास्त्रीयदृष्ट्या पूर्ण सिद्ध झालेला नाही. काही लोकांना त्रास होऊ शकतो, पण इलेक्ट्रिक गाड्यांमुळे लोक आजारी पडतात असं सरसकट म्हणणं चुकीचं आहे.”