भारत हा देश असा आहे कि जिथे सणांची काही कमी नाही. हिंदू धर्म आणि एकंदरीतच भारतीय संस्कृती ही ऋतूचक्रावर आधारलेली आहे. नवरात्र म्हणजे फक्त दांडिया, व्रत वैकल्य, देवीची आराधना एवढंच नव्हे तर या नवरात्रीचं आयुर्वेदात देखील मोठं महत्व आहे, कसं ते जाणून घेऊयात.
शारदीय नवरात्रीला आजपासून सुरुवात झालेली आहे. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, या दिवसात देवीची आराधन केली जाते. नऊ दिवस काही जण कडक उपवास देखील करतात. मात्र नवरात्रीचं महत्व फक्त एवढंच नाही. आयुर्वेदात नवरात्रीचं महत्व नेमकं काय आहे हे डॉ. नेहा जोशी यांनी सांगितलं आहे. नवरात्रीचा जो काळ आहे त्याला आयुर्वेदात ऋतुसंधिकाळ असं म्हणतात. वर्षाऋतूनंतर शरद ऋतूकडे जाणारा हा काळ असतो. या दिवसात मोठ्या प्रमाणात आजारांना आमंत्रण मिळतं. या दिवसात व्हायरल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. तसंच हवामानात बदल झाल्यामुळे देखील त्वचेचे विकार या दिवसात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते. या दिवसात पित्तप्रवृती वाढते. अनेकांना पित्ताचा आजार होतो त्यामुळे यावर उपाय काय तर उपवास.
ऋतूबदलामुळे शरीरातील पित्ताचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पित्ताचा त्रास वाढू नये यासाठी आणि शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी केला जातो तो उपवास. शरीराबरोबरच मनाची शुद्धी व्हावी यासाठी देवीची आरती केली जाते. नवरात्र आणि दांडिया हे एक घट्ट समीकरण आहे. नवरात्रीतील दांडिया म्हणजे फक्च खेळ नाही तर हा एका अर्थी शरीराचा होणारा व्यायाम आहे. यामुळे आपली पचनसंस्था देखील सुधारते.
प्रत्येक ऋतूनुसार येणाऱ्या सण उत्सावाला काही ना काही शास्त्रीय कारणं देखील आहेत. जर आपण प्रत्येक ऋतूनुसार येणारे सणवार आणि त्यानुसार आाहार घेतला तर शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे आयुर्वेदात नवरात्रीत निरोगी शरीरासाठी संतुलित आहार आणि उपवास महत्वाचा मानला जातो.