संग्रहित फोटो
हिवाळ्यात हा धोका का वाढतो याबाबत माहिती देताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे न्यूरोसायन्सेस व न्यूरोसर्जन विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. राकेश रंजन म्हणाले, “गेल्या एका आठवड्यात दररोज सुमारे एक ते दोन स्ट्रोकचे रुग्ण आढळून येत आहेत. हिवाळ्यात तापमान घटल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. तसेच थंड हवामानामुळे रक्त घट्ट होते, त्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याची शक्यता वाढते. यामुळे प्रामुख्याने इस्केमिक स्ट्रोक (मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अचानक अडथळा आल्यामुळे होणारा पक्षाघात) होतो. त्याचे प्रमुख कारण मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह अडथळा हे आहे. दुसरा प्रकार म्हणजे हेमोरेजिक स्ट्रोक, जो मेंदुतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे होतो आणि यामागे बहुतेक वेळा अनियंत्रित उच्च रक्तदाब कारणीभूत असतो.”
स्ट्रोकची सामान्य लक्षणे म्हणजे अचानक चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, हात किंवा पायात ताकद कमी होणे किंवा बधिरपणा येणे, बोलण्यात अडचण येणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दिसणे (दोन व्यक्ती/ वस्तु दिसणे), चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी किंवा तोल जाणे होय. डॉ. रंजन यांनी स्पष्ट केले की लक्षणे सुरू झाल्यानंतर पहिल्या चार ते साडेचार तासांचा ‘गोल्डन अवर’ (सुवर्ण तास) अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात योग्य वेळी उपचार मिळाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते आणि दीर्घकालीन होऊ शकणारे नुकसान कमी करता येते.
स्ट्रोकच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत बोलताना डॉ. रंजन म्हणाले, “महत्त्वाच्या उपचार कालावधीत स्ट्रोकची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’’ आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल हे स्ट्रोक-रेडी सेंटर म्हणून कार्यरत असून येथे समर्पित स्ट्रोक व न्यूरो फिजिशियन, चोवीस तास न्यूरोसर्जिकल सेवा तसेच सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या प्रगत निदान सुविधा उपलब्ध आहेत. विशेष न्यूरो आयसीयू तसेच सर्वांगीण फिजिओथेरपी व पुनर्वसन कार्यक्रम रुग्णांना जलद पुनर्प्राप्तीसाठी मदत करतात. रुग्णालयात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्ट्रोक उपचार प्रोटोकॉलनुसार ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ स्ट्रोक स्केल’ या एक मानक वैद्यकीय चाचणी (NIHSS) चे पालन केले जाते. त्यामुळे जलद मूल्यांकन, वेळेवर तपासण्या आणि तात्काळ उपचार शक्य होतात.
हिवाळ्यातील अतिरिक्त जोखीम घटक आणि जीवनशैलीविषयक बाबी
डॉ. रंजन यांनी हिवाळ्यातील निर्जलीकरणाकडेही लक्ष वेधले. हे अनेकदा दुर्लक्षित राहते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त अधिक घट्ट होते आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान, मद्यसेवन तसेच अनियंत्रित मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे घटक हिवाळ्यात स्ट्रोकचा धोका अधिक वाढवतात. तापमानात अचानक घट झाल्यास शरीरात शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदय व मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. हंगामी फ्लू आणि इतर संसर्गांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि दाहक प्रतिक्रिया वाढू शकतात, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.
या जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी पुरेसे पाणी पिणे, घरात हलका व्यायाम करणे, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियमित तपासणे तसेच हिवाळ्यात शिफारस केलेली लसीकरणे घेण्याचा सल्ला दिला. हे संसर्ग टाळण्यास मदत करतात आणि त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
हिवाळ्यात स्ट्रोकच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना, योग्यवेळी जागरूकता, त्वरित प्रतिसाद आणि विशेष स्ट्रोक उपचारांची उपलब्धताही बरे होणे आणि दीर्घकालीन अपंगत्व यामध्ये निर्णायक ठरू शकतो.






