(फोटो सौजन्य: Pinterest)
भारताची भूमी ही अनेक प्राचीन आणि रहस्यमय देवालयांनी समृद्ध आहे. झारखंड राज्यातील रामगढ जिल्ह्यातील रजरप्पा येथे वसलेले माता छिन्नमस्तिका देवीचे मंदिर हे अशाच अद्वितीय शक्तिपीठांपैकी एक आहे. धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ विशेष महत्वाचे मानले जाते. शारदीय नवरात्र काळात येथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते आणि मंदिर परिसर भक्तिरसाने भारून जातो.
महाविद्यांमधील एक शक्तिरूप
शास्त्रांमध्ये देवीच्या दहा महाविद्यांचा उल्लेख आहे. त्यात माता तारा, त्रिपुरसुंदरी, भुवनेश्वरी, काली, त्रिपुरभैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी, कमला आणि छिन्नमस्ता यांचा समावेश होतो. रजरप्पातील हे मंदिर छठी महाविद्या मानल्या गेलेल्या माता छिन्नमस्तिका यांना अर्पण आहे.
देवीचे अद्वितीय स्वरूप
मंदिराच्या गर्भगृहात विराजमान असलेले मातांचे रूप अत्यंत विलक्षण व अद्भुत आहे. उजव्या हातात खड्ग, तर डाव्या हातात स्वतःचे छिन्न केलेले मस्तक धारण केलेले आहे. त्यांच्या कंठातून तीन रक्तधारा प्रकट झालेल्या दाखवल्या आहेत – दोन धारा त्यांच्या जया व विजया या सहचरिणींना अर्पण केल्या आहेत, तर तिसरी धारा स्वतः देवी ग्रहण करतात. कमलासनावर उभ्या असलेल्या मातांच्या चरणांखाली कामदेव व रती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुण्डमाळा, सर्पहार व विसकटलेले केश अशा या रूपाला शक्ती, त्याग आणि पराक्रमाचे प्रतीक मानले जाते.
प्रकट्याची कथा
लोककथेनुसार, एकदा माता छिन्नमस्तिका आपली सहचरिणी जया व विजया यांच्यासोबत नदीत स्नान करीत होत्या. त्यावेळी दोघींना तीव्र भूक लागली व त्यांनी मातांकडे अन्नाची याचना केली. भाविकांच्या गरजेसाठी तत्काळ उपाय करावा म्हणून भगवतींनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःचे शिर छिन्न केले. त्यांच्या कंठातून उमटलेल्या रक्ताच्या तीन धारांपैकी दोन धारांनी जया व विजया तृप्त झाल्या, तर तिसरी धारा स्वतः देवीने प्राशन केली. त्या क्षणी माता छिन्नमस्तिकेचे प्राकट्य घडले. ही कथा मातांच्या अपरंपार करुणा व त्यागभावनेचे प्रतीक मानली जाते.
मंदिरापर्यंत पोहोचण्याचे मार्ग
हवाईमार्ग – सर्वात जवळचे विमानतळ रांची येथील बिरसा मुंडा विमानतळ असून ते मंदिरापासून अंदाजे ८० किमी अंतरावर आहे.
रेल्वेमार्ग – रामगढ कँट व बोकारो हे नजीकचे रेल्वे स्थानके आहेत. येथून ऑटो, बस किंवा टॅक्सीने सहज जाता येते.
सड़कमार्ग – रजरप्पा हे राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेले असून रांची, बोकारो, हजारीबाग व धनबाद येथून थेट बस व टॅक्सीची सोय उपलब्ध आहे.
वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त
निवासाची सुविधा
मंदिराजवळ भाविकांसाठी धर्मशाळा आणि गेस्टहाऊस उपलब्ध आहेत. तर रांची, रामगढ आणि बोकारो येथे उत्तम दर्जाचे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स मिळतात.