हृदयविकाराच्या उपचारांमध्येही लिंगभेद? सायन रुग्णालयाच्या आकडेवारीत पुरुष रुग्णांचे वर्चस्व; महिलांमध्ये लक्षणे दुर्लक्षित
महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे वेगळी आणि अनेकदा अस्पष्ट स्वरूपाची असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी उपचारासाठी उशिरा रुग्णालयात येणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे सायन येथील मुंबई पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या (सायन रुग्णालय) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सायन रुग्णालयातील गेल्या तीन वर्षाच्या हृदयविकाराशी संबंधित प्रक्रियांच्या आकडेवारीनुसार, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. २०२३ मध्ये पुरुषांमध्ये १,७५० हृदयविकाराशी संबंधित प्रक्रिया करण्यात आल्या, तर महिलांमध्ये हा आकडा ७४२ इतकाच होता. २०२४ मध्ये पुरुषांचे प्रमाण २,००० पर्यंत वाढले, तर महिलांमध्ये ८६० प्रक्रिया करण्यात आल्या. २०२५ मध्ये पुरुषांमध्ये १,९९८ तर महिलांमध्ये ८८४ प्रक्रिया नोंदवण्यात आल्या.(फोटो सौजन्य – istock)
थॅलेसेमियाग्रस्तांच्या स्वप्नांना मिळणार बळ! ‘चाइल्ड हेल्प फाऊंडेशन’कडून विशेष केंद्राची स्थापना
सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अनेक महिलांमध्ये आर्थिक ताण, अपुरी झोप आणि सामाजिक तणाव हेही हृदयविकारासाठी महत्त्वाचे जोखीम घटक ठरत आहेत. लक्षणे वेगळी असल्यामुळे महिलांमध्ये रुग्णालयात दाखल होण्यास उशीर होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, उपचारांच्या प्रकारांमध्येही महिलांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. रुग्णालयातील माहितीनुसार हृदयविकाराच्या प्रक्रियांसाठी येणा-या महिलांपैकी सुमारे २० टक्के महिलांवर दरवर्षी कोरोनरी अँजिओप्लास्टी केली जाते. तज्ज्ञांच्या मते, महिलांनीही हृदयविकाराच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देणे, नियमित तपासणी करणे आणि ताणतणाव कमी ठेवणे आवश्यक आहे.
या आकडेवारीनुसार उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण सुमारे ३० टक्क्यांच्या आसपासच आहे. म्हणजेच प्रत्येक तीन रुग्णांपैकी दोन रुग्ण पुरुष असल्याचे चित्र दिसून येते. डॉक्टराच्या मते, महिलामध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा छातीत तीव्र वेदना अशा पारंपरिक स्वरूपात दिसत नाहीत. त्याऐवजी श्वास घेण्यास त्रास, प्रचंड थकवा, असामान्य घाम येणे, तसेच अॅसिडिटीसारखी जळजळ अशी लक्षणे दिसतात, ही लक्षणे अनेकदा गॅस किंवा अपवन म्हणून दुर्लक्षित केली जातात.






