फोटो सौजन्य - Social Media
गुरू म्हणजे केवळ शाळा-कॉलेजमधील शिक्षकच नाहीत. गुरू हे ते असतात जे आपल्याला जीवन जगण्याचे धडे देतात, बोध देतात, आपल्यातल्या अज्ञानाचा अंधकार दूर करतात. आयुष्यात असे अनेक टप्पे येतात, जिथे गुरू वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. पण त्यांच्यापेक्षाही वेगळा आणि अनोखा गुरू म्हणजे ‘वेळ’. कारण वेळच अशी गोष्ट आहे जी प्रत्येक परिस्थितीत आपल्याला शिकवत राहते, चुकांमधून, यशामधून आणि पराभवामधून!
लहानपणी आपले पहिले गुरू असतात आपले आई-वडील. आई आपल्याला प्रेम, शिस्त आणि जबाबदारी शिकवते, तर वडील कठोर निर्णय घेणे, संयम ठेवणे आणि ध्येयपूर्तीसाठी कष्ट घेणे शिकवतात. त्यानंतर शाळेतील शिक्षक आपल्याला ज्ञान देतात, विचार करण्याची दिशा देतात. ते फक्त अभ्यास शिकवत नाहीत, तर जगणे शिकवतात.
तरुणपणी आपले मित्रसुद्धा गुरू होतात. त्यांच्या अनुभवांतून, चुका आणि यशातून आपण खूप काही शिकतो. कधी-कधी मित्र आपल्याला आयुष्यातील कठीण निर्णयांमध्ये मार्गदर्शन करतात. त्यानंतर आयुष्यात प्रेम येतं, एक प्रिय व्यक्ती, जो आपल्याला भावनांची, समर्पणाची, समजूतदारपणाची ओळख करून देतो. लग्नानंतर बायको किंवा नवरा एकमेकांचे गुरू बनतात. रोजच्या आयुष्यातून, संघर्षातून, समजुतीतून खऱ्या अर्थाने सहजीवन शिकवलं जातं.
करिअरमध्ये सहकारी, सीनियर आणि कधी-कधी कनिष्ठही गुरू बनतात. ऑफिसमधील वातावरण, संघर्ष, स्पर्धा, हे सगळं आपल्याला प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातील निर्णय घ्यायला शिकवतं.
पण या सगळ्यांपलीकडे जो गुरू आयुष्यभर आपल्यासोबत असतो, तो म्हणजे “वेळ”. वेळ आपल्याला धीर धरायला शिकवतो, थांबायला शिकवतो, पुढे जायला शिकवतो. वेळच आपल्याला चुकांपासून शिकवतो आणि यशाचा अर्थ समजावून देतो. कधी कधी वेळेनुसार माणसांची ओळख पटते. कोण आपल्यासाठी आहे? आणि कोण आपल्यासाठी सर्प आहे? या सगळ्यांची जाणीव आपल्याला वेळ करून देते. वेळेपेक्षाही मोठा कुणी गुरु असेल तर ते म्हणजे आपण स्वतः! आपण स्वतःसाठी एक सर्वात मोठे मार्गदर्शक आहोत. पण स्वतःची ही पारख वेळच घडवून आणते.
म्हणूनच म्हणतात ना,
“गुरू अनेक असू शकतात, पण वेळच तो गुरू आहे जो प्रत्येकाला सारखं शिकवतो!”
गुरुपौर्णिमेच्या या खास प्रसंगी, आमच्या वाचकांनाही हार्दिक शुभेच्छा!