फोटो सौजन्य - Social Media
मृत्यू जीवनाचं असं सत्य आहे जे कुणी टाळू शकत नाही. मृत्यू नंतर आपलं काय होतं? मृत्यूनंतर आपण विचार करू शकतो का? या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत आणि त्या गोष्टी सत्यात आहेत की नाही? यावर विज्ञानही काही ठोस पुरावे सादर करू शकला नाही. विविध धर्माच्या ग्रंथामध्ये स्वर्ग, जन्नत, जाहनुं अशा व्याख्यायिका जरूर आहेत पण विज्ञान आतापर्यंत तिथपर्यंत काही पोहचू शकला नाहीये. विज्ञान पोहचू शकला नाही म्हणून त्या गोष्टी आहेतच नाहीत हे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच ठरेल. असो, आपल्याला ठाऊक नसेल पण एखादी जीव गेलेली बॉडीदेखील हालचाल करते.
मृत्यूनंतर शरीर पूर्णपणे स्थिर होतं, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र वैद्यकीय विज्ञानानुसार मृत्यूनंतरही काही काळ शरीरात हलचाली, आकुंचन, आवाज किंवा बदल दिसू शकतात. या प्रक्रियेला पोस्टमॉर्टेम रिफ्लेक्स (Postmortem Reflex) असे म्हटले जाते. अनेकदा या हालचाली पाहून लोकांना वाटते की मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाली आहे, मात्र प्रत्यक्षात यामागे पूर्णपणे वैज्ञानिक कारणे असतात.
मृत्यूनंतर मेंदूचे कार्य काही मिनिटांत पूर्णपणे थांबते. मेंदू बंद पडल्यावर व्यक्ती पुन्हा जिवंत होण्याचा कोणताही प्रश्न उरत नाही. मात्र शरीरातील स्नायूंमध्ये काही काळासाठी उरलेली विद्युत ऊर्जा (Residual Electrical Activity) राहू शकते. यामुळे हात, पाय, बोटे, मान किंवा चेहऱ्याचे स्नायू अचानक हलणे, तडफडणे किंवा आकुंचन पावणे अशा हालचाली दिसू शकतात. या हालचाली अनैच्छिक असतात आणि त्यावर व्यक्तीचा कोणताही ताबा नसतो.
फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, मृत्यूनंतर स्नायू लगेचच कायमचे ताठ होत नाहीत. सुरुवातीला ऑक्सिजन कमी झाल्याने स्नायू सैल पडतात. त्यानंतर काही तासांत रिगर मॉर्टिस (Rigor Mortis) ही प्रक्रिया सुरू होते, ज्यात स्नायू ताठ होतात. पुढील काही दिवसांत शरीरातील ऊती विघटित होऊ लागल्यावर स्नायू पुन्हा सैल होतात. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली दिसू शकतात.
याशिवाय मृतदेह कुजण्याच्या प्रक्रियेत शरीराच्या आत गॅस तयार होतात. हे गॅस पोट, छाती किंवा घशावर दाब टाकतात. त्यामुळे मृतदेहाचा पाठ कधी कधी वाकतो, हात-पाय हलतात किंवा घशातून हवा बाहेर पडल्याने करुण आवाज, उसासे किंवा घोर्यासारखे आवाज येतात. पूर्वीच्या काळात अशा घटनांमुळे लोक घाबरून जात आणि मृत व्यक्ती जिवंत झाल्याचा समज पसरायचा. मृत्यूनंतर नखं आणि केस वाढल्यासारखे दिसणे ही आणखी एक सामान्य घटना आहे. प्रत्यक्षात मृत्यूनंतर नखं किंवा केस वाढत नाहीत. मात्र त्वचा कोरडी पडून आकुंचन पावते. त्यामुळे नखं आणि केस बाहेर आलेले दिसतात, ज्यामुळे ते वाढल्याचा भास होतो.
वैद्यकीय तज्ज्ञ स्पष्ट करतात की पोस्टमॉर्टेम रिफ्लेक्स म्हणजे जीवन परत येणे नव्हे, तर मृत्यूनंतर शरीरात होणारा शेवटचा जैविक प्रतिसाद आहे. याचा आत्मा, भूत, सावट किंवा अंधश्रद्धांशी कोणताही संबंध नाही. थोडक्यात, मृत्यूनंतर दिसणाऱ्या हालचाली, आवाज किंवा बदल हे शरीराच्या नैसर्गिक जैविक प्रक्रियेचा भाग आहेत. अशा घटनांकडे भावनिक किंवा अंधश्रद्धेच्या नजरेने न पाहता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.






