दारू ही शरीराला हानिकारक असतानाही तिचा प्रचार जगभरात वाढला आहे. जगातील सर्वच देशात तरुणांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. दारूबंदीचे कायदे आणूनही नागरिक दारू पिणं थांबवत नाहीत. दारूच्या नशेत अपघात, आत्महत्या, स्त्रियांना मारझोड, अनैतिक, अविवेकी वर्तन व एड्सची वाढ दिसून येत आहे. याचसोबत फॅटी लिव्हरच्या (Fatty Liver) समस्या वाढत आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार 2014 मध्ये भारतात 33 लाख लोकांचा मृत्यू दारूमुळे झाला होता व 15 ते 50 वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूसाठी दारू हेच प्रमुख कारण ठरले होते.(World Liver Day 2023)
भारत फॅटी लिव्हरची राजधानी?
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे संपूर्ण जगभरात 19 एप्रिल हा जागतिक यकृत (लिव्हर) दिवस पाळला जातो. जागतिक यकृत दिनाच्या निमित्ताने गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.सिद्धेश राणे याबाबत माहिती देताना म्हणाले, “आपल्या शरीरात यकृताचेही कार्य फार महत्त्वाचे असते. यकृत ही एक ग्रंथी असून पचनक्रियेमध्ये यकृताचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. ग्लायकोजनचा साठा करून ठेवणे, पाचक रस तयार करणे, प्लाझ्मा प्रोटिन सिन्थेसिस, हार्मोन तयार करणे आणि डिटॉक्सिफिकेशन या कामांचा त्यात समावेश आहे. यकृताबाबत काही समस्या निर्माण झाली तर जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.हिपॅटायटीस ए, बी, सी, ई सारख्या प्रकारच्या आजारांची माहिती सर्वदूर पोहोचली आहे. परंतु, सध्या शहरातील नागरिकांनी परदेशांतील जीवनपद्धती अवलंबिली जात असल्याने पोळीभाजी ऐवजी फास्टफूड व व्यायामाऐवजी रोज संध्याकाळी दारूच्या सेवनामुळे लिव्हरमध्ये चरबीचे प्रमाण वाढत जाते व ‘लिव्हर सिरॉसिस’ होऊन पेशंट दगावण्याची भीती अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात 20% नागरिकांमध्ये ‘फॅटी लिव्हर’चा आजार बळावत आहे.” सध्या भारताला मधुमेहाची राजधानी मानले जात असले तरी भविष्यात फॅटी लिव्हरची राजधानी म्हणून ओळखले जाईल, असे भाकितही डॉ. सिद्धेश राणे यांनी या वेळी केले.
[read_also content=”शुगर वाढल्याने ऑपरेशन पुढे, अजित पवारांच्या खुलाशानंतर नरेश म्हस्केंच्या विधानाने उडाली खळबळ, उदय सामंत यांचंही सूचक विधान https://www.navarashtra.com/maharashtra/naresh-mhaske-reaction-after-ajit-pawars-clarification-nrsr-386983.html”]
मद्यसंस्कृती घातक
चरबी साठवण्याच्या प्रक्रियेला ‘फॅटी लिव्हर’ असं म्हटलं जातं. वर्षानुवर्षे शरीरात चरबी साठत राहिल्यामुळे प्रक्रिया होत राहिल्याने 4 ते 5 वर्षात यकृत निकामी झाल्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे प्रमाण अधिक वाढीस लागले आहे. युवकांमध्ये मद्यसंस्कृती निर्माण करणार्या शेकडो युक्त्या आपण टीव्हीवरील जाहिराती, सेलिब्रिटींचे चेहरे, रेव्ह पार्ट्या, वाईन महोत्सव अशा विविध रूपांत बघत असतो. परिणामत: दारू पिणे सुरू करण्याचे सरासरी वय भारतात पूर्वी जे 27 वर्षे होते ते आता 17 वर्षांवर आले आहे. 17 वर्षे वयात, म्हणजे अकरावी-बारावीत असताना अनेक मुले-मुली बिअर, वाईन, शाम्पेन घेणे सुरू करीत आहेत ते आता आधुनिक असल्याचे चिन्ह बनत आहे. अनेक मध्यमवर्गीय मराठी स्त्रियाही आता क्लबमध्ये किंवा घरच्या पार्टीमध्ये पिऊ लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात 60 कोटी लिटर मद्यनिर्मिती होते व तेवढीच खपवली जाते त्यामुळे आज कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नजर टाकली असता 10 ते 12% रुग्ण हे लिव्हरच्या निगडीत आजारांनी त्रस्त आहेत अशी माहिती डॉ. राणे यांनी दिली.