जागतिक मानसिक आरोग्य दिन
कुटुंबातील घडामोडी, सोशल मीडिया, मित्रमैत्रिणी आणि शैक्षणिक ताणतणाव ही काही आव्हाने आहेत. गेल्या काही दशकांमध्ये जगामध्ये वेगाने बदल घडून येत आहेत त्यामुळे अशी अनेक नवी आव्हाने निर्माण झाली आहेत जी युवकांच्या मानसिक आरोग्याला चिंताजनक ठरत आहेत. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे समाजामध्ये आपआपसातील भेटीगाठी कमी झाल्या आहेत, नात्यांमध्ये दुरावा आला आहे.
शारीरिक कामे, व्यायाम यांचे प्रमाण कमी झाले आहे आणि बैठी जीवनशैली सर्वत्र दिसून येत आहे. इंटरनेटचा अति वापर केला जात आहे, इंटरनेटवर चुकीची माहिती, सायबर गुन्हे आणि सायबर बुलिंग यांची बजबजपुरी माजली आहे. डॉ. अपर्णा रामकृष्णन, कन्सल्टंन्ट, सायकियाट्री, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
नकारात्मक परिणाम
तरूणांच्या मनावर होतोय नकारात्मक परिणाम
सोशल मीडियामुळे अवास्तव अपेक्षा आणि तुलना वाढत आहे. महामारी, युद्ध, राजकीय अस्थैर्य आणि वातावरणात होत असलेले बदल यांचा देखील विपरीत परिणाम युवकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात माहिती आणि संसाधने अक्षरशः एका बोटावर उपलब्ध आहेत, त्यामुळे काही आव्हाने पार करणे सोपे आहे. पण त्यातून चुकीची माहिती, गैरसमज आणि चिथावणी यांना बळी पडण्याचा देखील धोका असतो, यांचा देखील नकारात्मक परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.
युवकांना मानसिक आरोग्याचा त्रास
कशामुळे होतोय मानसिक आरोग्याचा त्रास
जगभरातील २० ते २५% युवकांना मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. नैराश्य, अति चिंतेमुळे होणारे विकार, पदार्थांच्या गैरवापरामुळे होणारे विकार, खाण्याच्या चुकीच्या सवयी, एडीएचडी लक्षणे, व्यक्तिमत्वातील दोष, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर आणि स्वतःला इजा करून घेण्याची वृत्ती यांचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.
कसे राहते आयुष्य सुखकर
बालपणी, किशोरावस्थेमध्ये असताना आणि तरुण वयामध्ये मानसिक आरोग्य सकारात्मक राहणे हा संपूर्ण आयुष्यभर मानसिक आरोग्य चांगले राहण्याचा पाया असतो. त्यामुळे एकाग्रता, नियोजन, निर्णय घेण्याची क्षमता वाढते, शैक्षणिक, नोकरीव्यवसायातील कामगिरी सुधारते आणि अधिकाधिक यश संपादन करता येते. सामाजिक आणि संवाद कौशल्ये वाढीस लागतात, इतरांसोबतचे संबंध चांगले होतात आणि सामाजिक आयुष्य सुखी राहते.
हेदेखील वाचा – मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘या’ कला ठरतील प्रभावी, मेंदूत होईल सुधारणा
लवकर निदान आवश्यक
मानसिक आरोग्य बिघडले आहे हे लवकर समजून घ्यावे
युवावस्थेमध्ये समस्या भेडसावल्यास त्यांचे लवकरात लवकर निदान करून आणि त्यावर योग्य उपचार केल्यास मानसिक आरोग्याच्या गंभीर समस्या होणे टाळता येते. मानसिक आरोग्य चांगले असेल तर मानसिक बळ आणि लवचिकता टिकून राहते, त्यामुळे युवकांना भविष्यातील ताणतणावांना प्रभावीपणे सामोरे जाण्यात मदत होते. मानसिकदृष्ट्या निरोगी युवा निरोगी आणि समृद्ध समाज निर्माण करण्यात योगदान देतात.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ असलेली, सुखी आणि यशस्वी पिढी हवी असेल तर युवावस्थेमध्ये मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे.
हेदेखील वाचा – सोशल मिडीयामुळे बिघडतंय तरुणांचे मानसिक आरोग्य! एक तासाचा ब्रेक खूप महत्त्वाचा
युवा कसे सामोरे जाऊ शकतील?
सर्वात आधी हे समजून घ्या की मानसिक आरोग्याच्या समस्या खरंच असतात, त्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकतात आणि त्यावर उपचार करणे शक्य आहे. त्यासाठी मदत नेहमीच उपलब्ध असते. तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या कारण शरीर निरोगी तर मन निरोगी राहू शकते.
सकारात्मक प्रयत्न
लहान मुले आणि युवकांच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक आरोग्याला प्रोत्साहन मिळेल असे सकारात्मक, सुरक्षित वातावरण शाळेत राहावे यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. फक्त शैक्षणिक यशावर भर देणे पुरेसे नाही. मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये बदल घडून येत असल्याचे कसे ओळखायचे, त्यावर काय कार्यवाही करायची आणि सर्व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करेल अशी मदत यंत्रणा निर्माण करणे शिक्षकांनी शिकले पाहिजे.
मानसिक आरोग्याचे महत्त्व जपणारे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कल्याण होईल असे वातावरण कामाच्या ठिकाणी निर्माण केले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक, परवडण्याजोगी, वयानुरूप मानसिक आरोग्य देखभाल सेवा उपलब्ध करवून दिली पाहिजे.