चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील राजेवाडी धरणाला लागलेल्या गळतीमुळे सुरक्षितता विचार करून चार वर्षापूर्वी पाणी सोडून धरण रिकामे केले गेले. त्यामुळे परिसराला दहा ते बारा गावांना चार वर्षे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. धरण दुरूस्तीसाठी आमदार शेखर निकम हे गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या सुरू असलेल्या अथक प्रयत्नांना शुक्रवारी यश आले आहे. धरण दुरुस्तीच्या १५ कोटीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यामुळे डेरवण, सावर्डेसह परिसरातील पाणीप्रश्न चार वर्षानी सुटणार आहे.
डेरवण गावातील लोकांना पाणी उपलब्ध व्हावे, शेती उत्पादनाला वाव मिळावा या हेतूने डेरवण वालावलकर ट्रस्टचे काका महाराज यांच्या विशेष परिश्रमाने राजेवाडी धरण प्रकल्पाला १९९५-९६ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षात म्हणजे २००० मध्ये सुमारे १० कोटी रुपये खर्चून हा घरण प्रकल्प उभा राहिला. मात्र चार वर्षांपूर्वी धरणाच्या मुख्यविमोचकामधून अचानक गळती सुरू झाल्याने येथील जलसंधारण विभागाने दुरुस्ती आणि सुरक्षितता मुद्याचा विचार करुन चार वर्षापूर्वी धरणातील पाणी सोडून धरण रिकामे केले. मात्र दुरूस्ती न झाल्याने धरणात खडखडाट होऊन गेल्या चार वर्षांपासून कापशी नदी पात्र पाण्याविना कोरडे पडलेले आहे. परिणामी परिसरातील ग्रामस्थांना पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धरण दुरुस्ती चार वर्षे जैसे थे अवस्थेत राहिले. परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेत आमदार शेखर निकम हे सातत्याने या धरण दुरूस्तीसाठी प्रयत्न, पाठपुरावा करत होते. मंत्री, सचिव पातळीवर वारंवार भेटी घेत होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर फाईल पुढे पुढे सरकत राहिली. दोनवेळा अंदाजपत्रके तयार करण्यात आली. अखेर शुक्रवारी या धरण दुरूस्तीला १५ कोटी रूपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे योगदान महत्वाचे ठरले. यामुळे या धरण दुरूस्ती आणि परिसरातील गावीं पाणीटंचाई हे दोन्ही प्रश्न सुटणारे आहेत.
दरम्यान निधी मंजूरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी विशेष सहकार्य केल्याने त्यांना आमदार शेखर निकम यांनी धन्यवाद दिले आहेत. तसेच कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड, उपअभियंता सागर भराडे यांचेही सहकार्य लाभले आहे.