तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची (Tasgaon Agricultural Produce Market Committee) रणधुमाळी सुरू झाली असून, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९ गटातून एकूण १६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार असून, २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आज अनेक दिग्गजांनी आपल्या अर्ज दाखल केले.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू झाली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्यासाठी बाजार समिती सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीमुळे काही किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग घडले. सोमवारी अखेरच्या दिवशी १४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अंतिम अर्ज दाखल झालेली संख्या १६८ इतकी आहे. त्यामध्ये सोसायटी गटातील ११ जागांसाठी ९५ , ग्रामपंचायत गटातील ४ जागांसाठी ४८, व्यापारी गटातून २ जागेसाठी १७, हमाल तोलाईदार गटातून १ जागेसाठी ८ अर्ज दाखल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीपासून शेतकऱ्यांना निवडणुकीसाठी उभे राहता येणार असून, ५६ जणांनी शेतकरी म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल केलेल्या नेत्यांची मांदियाळी पाहता बाजार समितीची निवडणूक रंगतदार होणार असे चित्र दिसत आहे. अनेक दिग्गज नेते बाजार समितीसाठी इच्छुक असल्याने विशेषत: राष्ट्रवादी समोर अडचणी उभ्या राहतील, असे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गटाने दबाव गट तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमधून उमेदवारी न मिळाल्यास तिसरा पर्याय उभा राहू शकतो, असेही स्पष्ट चित्र दिसत आहे.