मुंबई: कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्यासंबंधी (Covid Centre Scam) आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची सोमवारी साडे आठ तास चौकशी करण्यात आली. ही चौकशी आता चव्हाण यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. कारण सूरज चव्हाण यांच्यानंतर आता ईडीने (ED) त्यांच्या भावाच्या खासगी कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे.
सूरज चव्हाणच्या भावाच्या नावावर तीन वेगवेगळ्या कंपन्या
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सूरज चव्हाण यांच्या भावाच्या नावावर तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. कोरोना काळात या कंपन्यांशी बीएमसीचा कुठलाही व्यवहार झाला होता का, कुठलं टेंडर या कंपनीला मिळालं होतं का, याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत. दरम्यान सूरज चव्हाणच्या माध्यमातून ईडी आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
किती कोटींचा घोटाळा ?
या प्रकरणात 22 कोटींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. कारण 30 पैकी 8 कोटीच आरोग्य सेवेवर खर्च झाल्याचा अंदाज आहे.उरलेले ते 22 कोटी कुणाकुणाच्या खात्यात वळवले ? याचा शोध सुरु आहे.
कोरोनाच्या काळात सूरज आणि आदित्यचं एकत्र काम
सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे राईट हँड समजले जातात. सूरज चव्हाण यांची सूचना म्हणजे आदित्य ठाकरेंचा आदेश, असं युवासेनेत समजलं जातं. युवा सेनेचा साधारण कार्यकर्ता ते आदित्य ठाकरेंचा विश्वासू ते थेट ठाकरे गटाचा सचिव, असा सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली वरळीत काम केलं. वरळीत कोव्हिड सेंटर, मदत कॅम्प उभारण्यात सूरज चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका होती. कोरोना काळात आदित्य ठाकरे यांनी कुणाला मदत करण्यासंदर्भात ट्विट केल्यावर संबंधितांना ती मदत करण्याची जबाबदारी सूरज चव्हाण यांच्यावरच असायची.या सगळ्या गोष्टींमुळे सूरज चव्हाण यांना आदित्य ठाकरेंचा राईट हँड समजले जाऊ लागले. तसेच विद्यापीठाच्या निवडणुकीतही त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
आरोप काय?
कोरोना काळात अनेक कंपन्यांना सूरज चव्हाण यांच्या मध्यस्थीनेच कोव्हिड सेंटरचं काम मिळाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच, ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांनी तिथे काम मिळवून दिलं. यातील गैरव्यवहाराची ईडी चौकशी करत आहे.