मिरा-भाईंदर मतदारसंघात उमेदवारांचा धुरळा, २६ इच्छुकांचे ५७ उमेदवारी अर्ज! भाजपच्या इच्छूकांची संख्या सर्वाधिक
भाईंदर: मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छुक आहेत. यामध्ये भाजपच्याच इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. अर्ज वाटपाच्या दुसऱ्या दिवशी आमदार गिता जैन, माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्यासह एकूण २६ इच्छुकांनी ५७ उमेदवारी अर्ज घेतले घेतल्याचे समोर आले आहे. आमदार गिता जैन यांनी भाजपसह शिवसेना (शिंदे गट) व अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज घेतल्याचे निदर्शनास आले.
हेदेखील वाचा- ‘सोनाई’चे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज; इंदापूरमध्ये येणार ‘ट्विस्ट’
आमदार गीता जैन यांनी भाजप, शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर यंदाची निवडणूक गेल्यावेळीप्रमाणेच अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गीता जैन यंदाची निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर अगदी ठाम आहेत. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मेहता यांनी भाजपमधून उमेदवारी मिळण्याची अशा बाळगली असून त्यांनी देखील जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याखेरीज भाजपमधूनच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवि व्यास, माजी नगरसेवक सुरेश खंडेलवाल यांनी देखील अर्ज घेतल्याने भाजपमध्येच सर्वाधिक ४ जण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याशिवाय शिंदे गटाच्या शिवसेनेतून उमेदवारी मिळण्याची आस लागून राहिलेले विक्रमप्रताप सिंह यांनी शिवसेनेच्या तिकिटावर तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तर त्यांच्या पत्नी निशा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी ज्येष्ठ नगरसेवक असिफ शेख यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे आमदार गिता जैन यांना तूर्तास भाजप व शिवसेनेतून उमेदवारी मिळविताना भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या महायुतीतील मित्र पक्षातील इच्छुकांसोबत तडजोड करावी लागणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हेदेखील वाचा- राहुल गांधी करणार प्रणिती शिंदेंशी लग्न? सुशीलकुमार शिंदे स्पष्टच बोलले…
महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांनी देखील अर्ज घेतला असून माजी नगरसेवक अरुण कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज घेतला आहे.
आरपीआय (आंबेडकर गट) मधील इच्छुक अरुणा कोहली-चक्रे, बहुजन विकास आघाडीमधील इच्छुक ऍड. विजय सातोस्कर तर १३ इच्छुकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यातील आमदार गिता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहता व माजी नगरसेवक ऍड. रवि व्यास यांच्यापैकी कोणाच्या पदरात भाजपची उमेदवारी पडणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघावर शिंदे गटाच्या शिवसेनेने केलेला दाव्यामुळे उमेदवारीबाबत निश्चित संभ्रम निर्माण झाला आहे.
भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांच्या यादीत मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली नसल्याने या जागेवरील भाजप व शिवसेनेतील दावा उत्कंठा वाढविणारा असून उमेदवारीचा तिढा देखील आणखी गडद होऊ लागला आहे. गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तर अर्ज वाटपाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असल्याने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे बोलले जात आहे.