वर्धा : जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या दमदार पावसाने कहर केला. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रविवारी लोअर वर्धा प्रकल्पाचे (Lower Wardha Project ) सर्व ३१ दरवाजे १०० सेमी उघडण्यात आले. तर अप्पर वर्धा काही दरवाजेही उघडण्यात आले आहेत. दोन्ही प्रकल्पांचे पाणी वर्धा नदीत (Wardha River) सोडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. आर्वी-कौंडण्यपूर रस्त्याची (Arvi-Koundanyapur road) वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्यम व लघु प्रकल्प यापूर्वीच भरले असून त्यापैकी ७ मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. सध्याच्या परिस्थितीत धाम प्रकल्प, पोथरा प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. उर्वरित प्रकल्पांनीही धोक्याची रेषा ओलांडली आहे. कवडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुऱ्हा, रोठा-१, रोठा- २, आष्टी, पिलापूर, कन्नमवरग्राम, परसोडी, मलकापूर, हराशी हे छोटे प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. प्रकल्पांतून दिवसेंदिवस पाणी वाहत असून त्यामुळे लहान – मोठे नाले तुडुंब भरून शेतात व गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
धाम नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सेलू तालुक्यातील येळाकेळी गावात पुराचे पाणी शिरले होते. लहान पुलावर पाणी वाढल्यामुळे नागरिकांच्या काही घरात पाणी शिरले होते. परिणामी, भितीच्या पोटी नागरिक रात्रभर जागे.
कारंजा तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. पूर व पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरवाडी मंडल, कारंजा मंडळ, ठाणेगाव मंडलात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्नमवारग्राम मंडळ परिसर, अनेक घरांची पडझड झाली. शेत विहिरी कोसळल्या, पीक जमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली, अनेक कुटुंबे बाधित, ठाणेगाव येथील रहिवासी सिंधू भिसे यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त.
आर्वी तालुक्यात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. कोपरा पुनर्वसन येथे राहणारा २४ वर्षीय तरुण शनिवारी रात्री ९ वाजता बाकडी नदीला आलेल्या पुराच्या तडाख्यात आला होता. तो अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा बचाव व शोध पथकाने घटनास्थळी पोहोचले. तरुणाला पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
आष्टी तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ४ प्रकल्प आज सकाळी ८ वाजता १०० टक्के क्षमतेने भरले आहे. त्यात आष्टी लघू, प्रकल्प, पिलापूर लघू प्रकल्प, परसोडी लघू प्रकल्प व मलकापूर लघू प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाचा वतीने करण्यात आले आहे.
२३ जुलै रोजी झालेल्या सततधार पावसामुळे आर्वी तालुक्यातील कौंढण्यपूर येथील पुलावरुन पाणी वाहत असल्याने कौढण्यपूर ते आर्वी रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प पडली होती. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे सर्व जलाशय, नद्या, नाले तुडुंब भरले आहे. जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, जुलै महिन्यांत पावसाने दोन आठवड्याभ-यापासून हजेरी लावल्यामुळे आतापर्यंत ८७४.५ मिमी पाऊस झाला आहे असून कारंजा, समुद्रपूर तालुक्यात १०० टक्क्यांवर पाऊस झाल्याची नोंद आहे.