ठाणे : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अनेक सुविधा,योजना पुरवण्यात सरपंचाचा मोठा वाटा असतो. ठाणे जिल्ह्यातील गावांचा विकास करणाऱ्या सरपंचांना ‘नवराष्ट्र’ (Navarashtra) आणि नवभारतच्या वतीने सन्मानित करण्यात आले. ठाण्यातील (Thane) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २० ऑक्टोबर २०२२ रोजी सरपंच सम्राट पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. समित कक्कड दिग्दर्शित ‘३६ गुण’ हा मराठी सिनेमा ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशन देखील यावेळी करण्यात आले. योगायोग म्हणजे ‘३६ गुण’ चित्रपटाची टीमच्या हस्ते ३६ सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते तथा माजी महापौर नरेश म्हस्के, उपिल्हाधिकारी अविनाश ठोंबरे, ठाणे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर, अभिनेत्री पूर्वा पवार आणि गौरविण्यात आलेले सरपंच उपस्थित होते.
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. मात्र लग्न जुळवताना पत्रिकेत किती गुण जुळत आहेत त्यावर लग्न करायचे की नाही हे ठरवले जाते. मात्र ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे या गोष्टींच्या पलीकडे जाऊन पत्रिकेपेक्षा एकमेकांच्या मतांना प्राधान्य देणे हाच संदेश ‘३६ गुण’ या मराठी चित्रपटात दिला आहे. त्यामुळे येत्या ४ नोव्हेंबर रोजी मराठी रसिकांनी सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहावा असे आवाहन यावेळी चित्रपटातील अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेत्री पूर्वा पवार यांनी केले.
‘३६ गुण’ चित्रपटासाठी सकारात्मक ऊर्जा हवी असून ती याठिकाणी बघायला मिळाली आहे. सरपंचाचे काम खूप मोठे आहे. येत्या काळात गावागावात जिल्हा पातळीवर नाट्यगृह तयार व्हावी यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत असे सांगत सरपंचांना पुढील कार्यासाठी संतोष जुवेकरने शुभेच्छा दिल्या.