
Maharashtra Breaking News Updates Today:
04 Jun 2026 11:40 AM (IST)
रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनने रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या तेल केंद्रांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या शांतता चर्चेवर संकटाचे सावट उभारले आहे.
04 Jun 2026 11:30 AM (IST)
देशांतर्गत शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. पश्चिम आशियातील गंभीर संकटामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी ५० निर्देशांक २४,३०० अंकांच्या खाली घसरला. सकाळी ९:२० वाजता, सेन्सेक्स २८४.५१ अंकांनी किंवा ०.३८% ने घसरून ७४,०६१.६६ वर व्यवहार करत होता. निफ्टी ६७.२५ अंकांनी किंवा ०.२९% ने घसरून २३,३३८.३५ वर बंद झाला. दरम्यान, रुपया डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी वधारून ९५.६९ वर उघडला.
04 Jun 2026 11:20 AM (IST)
विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. एप्रिल ते मे २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत तिकीट तपासणी पथकांनी ४ लाख ३० हजार प्रकरणे उघडकीस आणत ३० कोटी १३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.७५ लाख प्रकरणांमधून १२.०२ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे दंड वसुलीत तब्बल १५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मध्य रेल्वेकडून मेल-एक्स्प्रेस गाड्या, उपनगरीय लोकल, एसी लोकल तसेच रेल्वे स्थानकांवर नियमितपणे विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येते.
04 Jun 2026 11:10 AM (IST)
२०२८ च्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर एका विशिष्ट नावावर सहमत होण्याची शक्यता आहे. सध्याच्या वृत्तांनुसार, वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरची निवड श्रेयस अय्यर आहे, तर गौतम गंभीरने याबाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
04 Jun 2026 11:02 AM (IST)
आपल्या देशात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पातळीवर परीक्षा पद्धतशीरपणे चालवण्यासाठी राज्यस्तरावर बोर्ड स्थापन केले होते. १९२१ मध्ये ‘यूपी बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमीडिएट एज्युकेशन’ (UP Board) असे उत्तर प्रदेशातील पहिल्या बोर्डाचे नाव होते. त्या काळात यूपी बोर्डाचे कार्यक्षेत्र मोठे होते आणि ते अनेक भागातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करायचे.
04 Jun 2026 10:50 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात बेकायदा गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्येच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिस तपासात गेल्या दोन वर्षांत सुमारे 500 बेकायदा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
04 Jun 2026 10:40 AM (IST)
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. गुरुवारी (दि.४) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फरपूरच्या सर्वात मोठ्या प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. या भीषण आगीत 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
04 Jun 2026 10:36 AM (IST)
Pune Police Transfer : पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील १८ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर-
04 Jun 2026 10:30 AM (IST)
पुणे जिल्ह्यातून दुहेरी हत्येचे प्रकरण समोर आले आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून त्याने आपल्या वडिलांची आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील परिसरात बगाडवाडी येथील आहे.
04 Jun 2026 10:20 AM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प यांच्या इराणवर हल्ल्याविरोधात अमेरिकन संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संसदेच्या परवानगिशिवाय इराणवर सैन्य कारवाई करण्यापासून ट्रम्प यांना रोखण्यासाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील खासदारांनीच पाठ फिरवली आहे
04 Jun 2026 10:10 AM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. 4 जून 1947 रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात.आपल्या अचूक विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आजही चाहत्यांचे लाडके आहेत.मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन आणि आदर्श जोडी म्हणून अशोक व निवदेता सराफ यांच्याकडे पाहिले जाते.
04 Jun 2026 09:40 AM (IST)
Nashik TCS Case Nida Khan: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) चे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) मतीन पटेल यांची पुन्हा एकदा कसून चौकशी केली आहे.
गुन्हेगाराला आश्रय दिल्याने चौकशीचा फेरा मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी निदा खान हिला पाठीशी घातल्याच्या आणि आश्रय दिल्याचा संशय मतीन पटेल यांच्यावर आहे. यापूर्वीही एसआयटी पथकाने त्यांची दोन ते तीन वेळा चौकशी केली होती.
04 Jun 2026 09:30 AM (IST)
Nashik Vidhan Parishad Election आगामी नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) रिंगणात महायुतीसमोर निर्माण झालेला बंडखोरीचा मोठा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते, मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर, भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते (Ganesh Gite) यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे.
२४ तासांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर बंड थंड नाशिकमधील या बंडखोरीमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे संकट उभे राहिले होते. हा वाद मिटवण्यासाठी गेल्या २४ तासांपासून मुंबईत मॅरेथॉन बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. गिरीश महाजन यांनी गणेश गीते यांची मनधरणी करण्यात यश मिळवले असून, पक्षाची शिस्त आणि महायुतीचा धर्म पाळत गणेश गीते यांनी माघार घेण्यास संमती दिली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
04 Jun 2026 09:23 AM (IST)
Muzaffarpur Prasad Hospital Fire बिहारमधील मुझफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. येथील ब्रह्मपुरा भागातील प्रसाद रुग्णालय (Prasad Hospital) च्या पाचव्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाला (ICU) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आगीत होरपळल्याने आणि वॉर्डमध्ये पसरलेल्या धुरामुळे दम कोंडल्याने ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागली आग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. ही आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच संपूर्ण वॉर्डला आगीने वेढले आणि तिथे काळोख व धूर पसरला. आग लागल्याचे समजताच रुग्णालयात एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कसाबसा जीव वाचवत बाहेर धाव घेतली
04 Jun 2026 09:11 AM (IST)
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुन्हा एकदा हुंडाबळीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं?
पूजा प्रमोद सुरवसे (वय २०) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पूजा ही मूळची परभणी येथील रहिवासी. वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी तीच लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. मात्र काही दिवसांनंतर व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ करत असल्याचे पूजाने आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. याच छळाला कंटाळून पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र ठरलेल्या 81 लाख लाडक्या बहिणींपैकी 62 लाख लाडक्या बहिणींची केवायसी झालेली नाही. अनेक लाडक्या बहिणीने सरकारच्या निकषांना घाबरूनच ती केवायसी केलेली नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पात्र असलेल्या लाडक्या बहिणीची पुन्हा ही केवायसी पडताळणी केली जाईल, असे आश्वासन महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे राज्यातील लाडक्या बहिणींना दिले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाचाही अर्ज बाद करण्यात आलेला नाही. या योजनेच्या पात्रता निकषांपैकी वयाचे, उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदारांची माहिती संबंधित विभागांकडून प्राप्त झाली. तसेच, ज्या अर्जदारांच्या नावावर वाहन नोंदणी आहे, अशाही अर्जदारांची माहिती आरटीओ विभागाकडून प्राप्त झाली आहे. काही अर्जदार शासनाच्या इतर योजनांचेही लाभार्थी असल्याची बाब संबंधित विभागांकडून निदर्शनास आली आहे. काही अर्जदारांनी विहित कालावधीत ई-केवायसी न केल्याने त्यांचा लाभ स्थगित झाला आहे.