File Photo : Aditi Tatkare
मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये अहिल्याभवनचे काम सुरू असून, उर्वरित जिल्ह्यांतही मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. पिंक ई-रिक्षा योजनेंतर्गत 5 हजार पात्र महिलांना लवकरच रिक्षा देण्यात येणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : Kalyan Builder: कुख्यात बिल्डर सलमान डोलारेचा आणखी एक कारनामा समोर,अनधिकृत इमारत उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी अहिल्याभवनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात विभागीय योजनांचा आढावा त्यांनी घेतला. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत फिरत्या पथकाने 3 हजारांहून अधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कामकाज करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी अंगणवाडी केंद्रासोबत पाळणाघर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाळणा सेविका, मदतनीस आणि निर्भया समुपदेशन केंद्राच्या समन्वयकांचे मानधन वाढविण्याचा विचारही सुरू असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले. माध्यमिक शिक्षणाकडे मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी शिक्षण विभागाशी समन्वय साधण्याचाही निर्णय घेण्यात आला.
निकषात बसत नसल्याचे अर्ज बाद होणार
लाडकी बहिण योजनेमध्ये निवडणुकीच्यापूर्वी महायुती सरकारने सर्व महिलांना योजनेचा लाभ दिला. मात्र, निकालानंतर आता अपात्र महिलांच्या अर्जाची छाननी केली जात आहे. यामध्ये एका बांगलादेशी घुसखोर महिलेने देखील योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांच्या डोक्यावर अर्ज बाद होण्याची टांगती तलवार आहे. याबाबत आता मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्ण माहिती दिली आहे.
‘लाडकी बहीण’वरून गैरसमज
लाडकी बहीण योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहेत अशी देखील चर्चा आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांना माध्यमांनी सवाल विचारला. यावर त्या म्हणाल्या की, “मला माहीत नाही हा आकडा कुठून येतो. पण माझी सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा कोणत्याही बातम्या आणि अफवांना बळी पडू नका. २ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात लाभ थेट हस्तांतरण करण्यात आलं आहे.” असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: सौरभ भोंडवेचा अपघात की घातपात? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक खूनप्रकरणे उजेडात