फोटो सौजन्य - सोशल मिडीया
भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत विजेचा धक्का लागून एका ६ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यशस्वी सोपान राऊत (वय ६ वर्ष) असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. ती पुयार गावातील रहिवासी होती. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा सुरु झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत यशस्वी सोपान राऊत शिक्षण घेत होती. ती पहिल्या वर्गात शिकत होती. ही शाळा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येते. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास यशस्वी राऊत शाळेत आली होती. त्यानंतर ती स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी तिला विजेचा धक्का लागून ती बेशुध्द पडली. या घटनेची माहिती मिळताच शाळेतील सर्व शिक्षक घटनास्थळी दाखल झाले.
यशस्वी अचानक बेशुध्द झाल्यामुळे शाळेत मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. शिक्षकांनी लगेचयशस्वीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकाराबद्दल गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. यशस्वीच्या पालकांचा आक्रोश हृदय हेलावणारा होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सॅनिटरी पॅड डिस्पोज करणाऱ्या मशिनचा विद्युत पुरवठा सदोष होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोरेगाव परिसरातील एका मैदानात देखील विजेचा धक्का लागून १० वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. मीनाताई ठाकरे ग्राउंड, न्यु म्हाडा कॉलनी, गोरेगाव पूर्व येथे ही घटना घडली. आदिल चौधरी असं मृत मुलाचे नाव आहे. आदिल मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळताना त्यांचा बॉल पोलिस चौकीच्या छतावर गेला. छतावर अडकलेला बॉल काढण्यासाठी आदिल लोंखडी सुरक्षा भिंतीवर चढत होता. त्यावेळी तो विजेच्या संपर्कात आला. लोंखडी ताऱ्यांमुळे आणि विजेचा ताऱ्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.