File Photo : Leopard
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच आहे. बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास तेजेवाडी येथे वीटभट्टी मजुराच्या 9 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुपेश तानाजी जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील म्हैसगाव येथून तो आपल्या आजोबांकडे आला होता. या घटनेने तालुक्यांत पुन्हा भितीचे सावट पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी काळवाडीच्या मुंजेश्वर वस्तीवर घडलेल्या घटनेत रुद्र महेश फापाळे या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले होते. रूद्रचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. रुद्र बेलापूर (बदगी) या त्याच्या गावाहून काळवाडी येथे यात्रेनिमित्ताने नातेवाईकांकडे आला होता. रुद्र त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
आळे येथील तितरमळा येथील शिवांश अमोल भुजबळ या लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. शिरोली खुर्द येथे मेंढपाळाच्या वाड्यावर झोपलेल्या दीड वर्षाच्या संस्कृती संजय कोळेकर (मूळ रा. धोत्रे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.
जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र
जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र असून, आता तर बिबट समस्येने उग्र रूप धारण केले आहे. शासन मात्र या प्रश्नी पूर्णपणे उदासीन दिसत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देणे, जखमींना आर्थिक मदत करणे, यापलीकडे वनविभाग देखील काही करत नसल्याचे दिसून येते. 2021 साली जुन्नरजवळील हापुसबाग शिवारात अक्षय हा बिबट्याने घेतलेला तालुक्यातील पहिला बळी ठरला.