संग्रहित फोटो
चाकण : आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे वेगवेगळ्या भागात दौरेदेखील वाढले आहे. पक्षप्रवेशाचे कार्यक्रमही पार पडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला आमदार, अध्यक्षांची उपस्थित
या कार्यक्रमाला आमदार शरद सोनावणे, जिल्हा अध्यक्ष भगवान पोखरकर, कामगार नेते इरफान सय्यद, तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामपातळीवरील शेकडो शिवसैनिक व महिला भगिनी उपस्थित होते. अतुल देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात शिवसेनेचा भगवा हातात घेत प्रवेश केला.
राजकीय समीकरणात बदल
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका लक्षात घेता, अतुल देशमुख यांच्या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्यामुळे देशमुख यांचा पक्षप्रवेश शिवसेनेला मोठी ताकद देणारा ठरणार आहे.
सर्व जागांवर शिवसेना उमेदवार उतरवणार
देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “आम्ही सर्व कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा स्थापन करणार आहोत. आगामी सर्व निवडणुकांमध्ये नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्व जागांवर शिवसेना उमेदवार उतरवणार असून तालुक्यात भगवा फडकवू, असे आश्वासन दिले.
तालुक्यात भगवा फडकवायचा!
या प्रवेश सोहळ्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अतुल देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेत आले हे मी जाहीर करतो. आता तुमचं एकच ध्येय असावं, तालुक्यात भगवा फडकवायचा! सर्वांनी ताकदीने काम केलं तर विरोधकांचे डिपॉझिट जप्त होतील. शिंदे पुढे म्हणाले, “राजकारणात योग्य वेळी घेतलेला निर्णयच मोठे परिणाम घडवतो. देशमुख यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असून, मूर्ती लहान पण कीर्ती महान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं
शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधताना म्हटले, आज मला काही लोक ‘भकास मंत्री’ म्हणतात. पण मुख्यमंत्री असताना मी स्वतः रस्त्यावर उतरून काम केलं. एक साधा शाखा प्रमुख म्हणून सुरुवात करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, हे माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शक्य झालं.
शेतकऱ्यांना ३२ हजार रुपयांचे अनुदान
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना ३२ हजार रुपयांचे अनुदान, ‘लाडकी बहीण योजना’, ‘एस.टी.मध्ये सवलत’, आणि कर्जमाफी अशा अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला आणि ८० पैकी ६० जागांवर आम्हाला विजय मिळवून दिला. महिलांच्या प्रश्नांवर बोलताना शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना ही आमच्या सरकारची संवेदनशील योजना आहे. काही अफवा पसरवल्या जात आहेत, पण मी स्पष्ट सांगतो लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे.
औद्योगिक वाढ झाल्यामुळे ट्रॅफिक
चाकण परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, या भागात औद्योगिक वाढ झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. या समस्येवर उपाय म्हणून ५००० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. लवकरच या निधीच्या मदतीने रस्ते, पूल, आणि पर्यायी मार्गांचे काम सुरू होणार आहे. यामुळे शिंदे यांनी देशमुख यांच्या प्रवेशाचे कौतुक करत म्हटले, देशमुख यांचा प्रवेश म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्याला नवी ताकद मिळाली आहे. त्यांचं संघटन कौशल्य आणि जनसंपर्क नक्कीच पक्षाला पुढे नेईल. मी एकदा शब्द दिला की मागे फिरत नाही, आणि शिवसेना नेहमी आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील.






