सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) पुण्यातील पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात आले होते. तरीही कोथरूड मतदार संघातील बाळासाहेब खंकाळ महायुतीच्या प्रचारात उपस्थित होते, त्यामुळे पक्षविरोधी काम करत असल्याने त्यांच्यावर पक्षाच्या वतीने सर्वानुमते हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सोनवणे यांनी पुढे सांगितले की, यापुढे बाळासाहेब खंकाळ यांना पक्षाच्या कुठल्याही पदाचा वापर करण्यात येणार नाही, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, वडगावशेरी विधानसभा अध्यक्षपदी पक्षाच्या वतीने अधिकृतपने विनोद टोपे हे अध्यक्ष असतील तसेच कोथरूड मतदारसंघाच्या अध्यक्षपदी भारत भोसले असतील. शहर अध्यक्षाच्या सहमतीने व सहयाने शहरातले इतर सर्व पदाची नियुक्ती करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही संजय सोनवणे यांनी सांगितले आहे.
रिपाइं प्रचारात सहभागी होणार नाही
भारतीय जनता पक्ष महायुतीमधील अन्य घटक पक्षांबरोबर जागांची वाटाघाटी करत आहे. मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले- रिपाइं ) एकही जागा न देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा द्याव्यात, अशी आग्रही मागणी रिपाइंकडून करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. जागा वाटपाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत, रिपाइंचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानंतरच प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला जाईल, असे रिपाईच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
रिपाइंने कोणत्या जागा माहितल्या आहेत?
रिपाइंने मुंबईतील चेंबर, धारावी, अहमदनगरमधील श्रीरामपूर, उत्तर नागपूर, यवतमाळ मधील डमर-खेड, नांदेडमधील देगल्लूर, पुण्यातील पिंपरी-चिंचंवड आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत रिपाइंने मतदारसंघात पूर्ण ताकदीने काम केले. त्यामुळे पुण्यातील वडगावशेरी किंवा पुणे कॅन्टोन्मेंटपैकी एक जागा सोडावी, अशी आग्रही मागणी आहे, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.