आळंदी : आळंदी ग्रामीण रुग्णालयात (Alandi Hospital) उपचारास रुग्णास नेत असताना रुग्णवाहिकेस रहदारीला अडथळा झाला आणि वेळेत उपचार मिळू न शकल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. संबंधित तरुणी आंब्याच्या झाडावरून खाली पडली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यादरम्यान हा प्रकार घडला.
या घटनेत उज्ज्वला नामदेव झाडे (वय २१ वर्षे, रा. आळंदी देवाची) या युवतीचा मृत्यू झाला. उज्ज्वला ही आळंदीत गायन शिकत होती. एका कंपनीत कामावर देखील जात होती. आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी नलावडे यांनी रुग्णवाहिकेचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच आरोग्य सेवा यंत्रणा सुसज्ज ठेवत संबंधित कर्मचारी यांना सतर्क केले होते. मात्र, आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस स्टेशनच्या मधील नऊ मीटर रस्त्यावर असलेल्या भाजी विक्रेते आणि बेकायदेशीर दुचाकी पार्किंग, रहदारीच्या गर्दीने रुग्णवाहिकेस रुग्णालयाचे बाहेरून आत पोहोचण्यास सुमारे 20 मिनिटे लागल्याचे रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले. रुग्णाला रुग्णालय बाहेर रुग्णवाहिकेत उपचार करण्यास नेत असताना आळंदी ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्यास गर्दी, विक्रेते आणि वाहन पार्किगने विलंब झाल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय अधिकारी यांनी यंत्रणा सज्ज ठेवली होती. उपचारापूर्वी रुग्णाचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नलावडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देखील दुचाकी वाहनधारक आणि विक्रेते, ग्राहक यांचेशी संवाद साधून रुग्णास पुढील शवविच्छेदनासाठी घेऊन जायचे असल्याचे सांगत वाट मोकळी करून देण्याचे आवाहन केले. या भागात तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात बेकायदेशीर वाहने लावल्याने आळंदी वाहतूक पोलीस शाखेच्या कर्मचारी, अधिकारी यांनी तात्काळ रहदारीचे अडथळे दूर केले. त्यानंतर रुग्णवाहिकेस मार्ग करून दिला.
गर्दीचा बसला फटका
रुग्णालयाकडे जाण्याच्या रस्त्यावर रविवार असल्याने प्रचंड गर्दी झाली होती. सदर युवती आंब्याचे झाडावरून पडून जखमी झाली होती. उपचारास आळंदी ग्रामीण रुग्णालयात आणताना विलंब झाला. डॉ. नलावडे म्हणाल्या, जर वेळेत उपचारास मुलगी पोहोचली असती तर वाचली असती. उपचारापूर्वी युवतीचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले.