संग्रहित फोटो
जत : जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जत तालुक्यातील सनमडी येथे शुक्रवारी पहाटे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. गॅस स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनमडी येथील नाथाजी तुकाराम नरळे हे कुटूंबियासह सनमडी येथील चोपडेमळा येथे राहतात. शनिवारी सकाळच्या सुमारास गॅसवर चहा ठेवून जनावरे सोडण्यास बाहेर गेले असता अचानक गॅसला गळती लागली व झोपडीवजा घराला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच घरात झोपलेल्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर गॅसचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील सर्व धान्य, साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे नरळे कुटूंबिय उघडयावर पडले आहे.
या घटनेची माहिती मेजर सचिन सरगर यांच्याकडून मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी नरळे कुटूंबियांची भेट घेतली. त्यांनी नरळे कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही केली. यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, नरळे कुटूंबीय हे गरीब आहे. या दुर्घटनेत त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मानवतेचा धर्म पाळून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.