ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना मायानगरीची सफर! वडाखालच्या शाळेतील आदिवासी मुलांची 'काळाघोडा' आर्ट फेस्टिव्हला भेट
कर्जत येथील ग्रुप ग्रामपंचायत पोशिर हद्दीतील वारे-चिंचवाडी येथील ठाकर आदिवासी वाडीत सुरू असलेल्या ‘वडाखालच्या शाळे’ च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांपलीकडचे जग अनुभवता यावे, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि आत्मविश्वास बळकट व्हावा, या उद्देशाने मुंबईत भरवण्यात आलेल्या ‘कला घोडा आर्ट फेस्टिव्हल २०२६’ला नेण्यात आले. या चार दिवसांच्या शैक्षणिक सहलीमुळे आदिवासी भागातील मुलांसाठी शिकण्याचे नवे दालन खुले झाले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
या महोत्सवात सहभागी झालेल्या वडाखालच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विविध प्रकारच्या कलांचे प्रत्यक्ष दर्शन घडले. रंगीबेरंगी चित्रप्रदर्शने, जिवंत शिल्पकला, रस्त्यावरील नाट्यप्रयोग, लोकनृत्य, संगीत मैफिली आणि सहभागी कार्यशाळांमधून मुलांना आपले विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळाली.
ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांसाठी असा महोत्सव अत्यंत महत्वाचा ठरतो. विविध संस्कृती, वेगवेगळ्या विचारधारा आणि अभिव्यक्तीचे प्रकार जवळून पाहिल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली. आपणही काहीतरी वेगळं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या मनात रुजला. अनेक मुलांनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कला आणि संस्कृतीचा अनुभव घेतल्याने त्यांच्यात कुतूहल, उत्सुकता आणि शिकण्याची ओढ वाढल्याचे दिसून आले. या निमित्ताने वडाखालच्या शाळेतील मुलांना चार दिवस छोट्या गटांमध्ये मुंबईला नेण्यात आले. या प्रवासात केवळ कला महोत्सवच नव्हे, तर महानगरातील जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधीही त्यांना मिळाली. अनेक मुलांनी पहिल्यांदाच समुद्र पाहिला, स्वतः तिकीट काढून मेट्रोतून प्रवास केला, डबल डेकर बेस्ट बसमध्ये बसले.
कला ही केवळ पाहण्याची गोष्ट नसून, ती अनुभवण्याची, प्रश्न विचारण्याची आणि स्वतःला शोधण्याची प्रक्रिया आहे, हे या मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून उमगले. यासोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेला आतून भेट देत देशाची आर्थिक व्यवस्था समजून घेतली. दूरून का होईना मंत्रालय, विधान भवन आणि महानगरपालिका पाहून प्रशासनाची रचना आणि कामकाजाची माहिती मिळाली. ही सहल केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मुलांचा आत्मविश्वास वाढवणारी, शहर, व्यवस्था आणि व्यापक जग समजून घेण्याची शिकवण देणारी ठरली, वेगाने धावणाऱ्या शहरांमध्ये हरवत चाललेली मानवी मूल्ये आदिवासी समाजात तरी टिकून राहावीत आणि त्याचबरोबर या मुलांनाही बदलत्या जगाशी संवाद साधता यावा, या उद्देशाने वडाखालची शाळा अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत आहे, कला घोडा’ आर्ट फेस्टिव्हलमधील हा अनुभव शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून जीवन समजून घेण्याची प्रक्रिया आहे. हैं ठळकपणे अधोरेखित करणारा ठरला आहे.






