फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारतीय क्रिकेटमध्ये, खेळाडूंमधील नाते बहुतेकदा विजय आणि पराभवाच्या पलीकडे जाते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर असाच एक दृश्य घडले जेव्हा भारत-अमेरिका सामन्यादरम्यान, कर्णधार सूर्यकुमार यादवने लाखो चाहत्यांची मने जिंकून घेणारा पराक्रम केला. सूर्या आणि ‘हिटमॅन’ यांच्यातील नाते भारतीय चाहत्यांसाठी नेहमीच खास राहिले आहे. जेव्हा सूर्यकुमार यादव अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टॉसला पोहोचला तेव्हा एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.
टॉस सुरू होणार असतानाच सूर्याची नजर तिथून जाणाऱ्या माजी कर्णधार रोहित शर्मावर पडली. दरम्यान, सूर्याने लगेच टॉस सोडून रोहितकडे धाव घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. संपूर्ण वानखेडे स्टेडियम या “ब्रोमान्स” ने दुमदुमून गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसीसीने देखील हा व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघांचे संभाषण देखील कॅमेरामध्ये कैद झाले आहे. यामध्ये सुर्या रोहितला म्हणतो की, पटकन सांग काय घेऊ बॅटींग करु का? यावर रोहित म्हणतो की पागल झाला आहेस का बाॅलिंग कर. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली.
अमेरिकेचा वेगवान गोलंदाज शॅडली व्हॅन शाल्कविकने भारतीय संघाच्या वरच्या आणि मधल्या फळीला उद्ध्वस्त केले. त्याने चार षटकांत फक्त २५ धावा देत चार बळी घेतले. इशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे सारखे स्टार खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले होते आणि १३ व्या षटकापर्यंत भारताची धावसंख्या ७७/६ होती. टीम इंडिया त्यांचा पहिला सामना गमावेल असे वाटत होते, पण त्यानंतर कर्णधार सूर्याने जबाबदारी स्वीकारली. त्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची धमाकेदार खेळी करत भारताला ९ बाद १६१ धावांपर्यंत पोहोचवले.
१६२ धावांचा पाठलाग करताना, अमेरिकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर असहाय्य दिसत होता. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आणि त्याने त्याचा फायदा घेतला. सिराजने तीन बळी (२९ धावांत), अर्शदीप सिंगने दोन बळी (१८ धावांत) आणि अक्षर पटेलने दोन बळी (२४ धावांत) घेतले. सिराजने अँड्रीस गौस आणि सैतेजा मुक्काल्ला यांना लवकर बाद केले, तर अर्शदीपने कर्णधार मोनांक पटेलला शून्यावर बाद करून अमेरिकेचे कंबरडे मोडले. अमेरिकेला त्यांच्या निर्धारित २० षटकांत फक्त १३२/९ धावा करता आल्या आणि भारताने २९ धावांनी सामना जिंकला.
या विजयासह, भारताने सलग नववा टी-२० विश्वचषक विजय नोंदवला, जो एक विश्वविक्रम आहे. त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा (प्रत्येकी ८ विजय) मागील विक्रम मागे टाकला.






